घरमुंबईगणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास केडीएमसीला 'खड्डे रत्न' पुरस्काराने गौरवणार

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास केडीएमसीला ‘खड्डे रत्न’ पुरस्काराने गौरवणार

Subscribe

कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाली असून केडीएमसीने वेळीच खड्डे न बुजवल्यास त्यांना पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने निवेदनाद्वारे दिला आहे.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. मात्र अद्याप कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेली नाहीत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याची कामे न केल्यास वाजत गाजत गुलाल उधळीत मिरवणूक काढून, केडीएमसीला ‘खड्डे रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असा इशारा मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम आणि महिला अध्यक्षा मंदा पाटील यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. तर प्रशासनातील हुशार अधिकारी आणि टक्केवारीत अडकलेले सत्ताधारी यामुळे डोंबिवलीची ओळख ‘खड्डयांचे शहर’ म्हणून झाली आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

नागरिकांना त्रास

डोंबिवली शहर व ग्रामीण पट्ट्यात प्रत्येक रस्त्यात खूप खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की, खड्डयात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने वाहन चालक व नागरिकांना प्रवास करताना वाहतूक कोंडी, अपघात व प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच खड्डे बुजविण्याची जी थुकपट्टीची कामे केली आहेत, त्यामुळे आता सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. खड्डेमय रस्ते, दुरूस्ती कामातील कुर्मगती व निकृष्ट दर्जाचे काम पहाता व करदात्या नागरिकांना जो सततचा विकतचा त्रास आपण देत आहात तो पहाता आपण खरोखरच सन्मानाच्या पात्रतेचे आहात, अशी धारणा बनते, असेही मनसेने निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही; पण प्रविण चौगुलेच्या स्वामी निष्ठेला सलाम’

डोंबिवलीची ओळख ‘खड्डयांचे शहर’

दरवर्षी पावसाळयात खड्डयांची समस्या उद्भवते. काही रस्ते हे एमएसआरडीसी, काही सार्वजनिक बांधकाम विभाग तर काही केडीएमसीचे आहेत. मात्र एमएसआरडीसी व पीडब्लूडीच्या अखत्यारीतील रस्त्यांकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात. तर सदर रस्ते पालिकेचे नसल्याने पालिकाही दुर्लक्ष करते. एकमेकांच्या हद्दीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. सध्या पाऊसही थांबला आहे. मात्र प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अजूनही सुरूवात झालेली नाही, अशी नाराजी कदम यांनी व्यक्त केली. दरवर्षी पालिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यांची दुर्दशा होते. प्रशासनातील हुशार अधिकारी आणि टक्केवारीत अडकलेले सत्ताधारी यामुळे डोंबिवलीची ओळख ‘खड्डयांचे शहर’ म्हणून झाली आहे. त्यामुळे गणपती अगोदर रस्ता दुरूस्तीची कामे न केल्यास ‘खड्डे रत्न’ पुरस्कार घेण्यासाठी तयार रहा असेही मनसेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -