घरताज्या घडामोडीबाळाला पहायचं तर हजार रुपये द्या; गरिब रुग्णांची लूट

बाळाला पहायचं तर हजार रुपये द्या; गरिब रुग्णांची लूट

Subscribe

बाळाचा जन्म हा मातेसाठी तसेच कुटूंबियांसाठी अतिशय आनंदाचा क्षण असतो. बाळ सुखरूप जन्मल्यानंतर सगळयांच्या जीवात जीव येतो. बाळाला पाहण्यासाठी कुटूंबाची उत्सुकता शिगेला असते. पण पहिल्यांदा बाळाला पाहण्यासाठी रूग्णालयातील कर्मचारी नातेवाईकांकडून चक्क पाचशे ते एक हजार रूपयांची सक्ती करीत असल्याचा धक्कादायक प्रकार केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात घडत आहे. महापालिकेच्या रूग्णालयात गोरगरीब रूग्ण येत असतात. त्यामुळे कमी पैसे घ्या, अशी विनवणी करूनही कर्मचारी अडून बसतात. मात्र अनेकांनी तक्रारी करूनही प्रशासनाने या प्रकाराकडे कानाडाेळा केल्याने कर्मचाऱ्यांची लूट सुरूच असल्याने रूग्णांमध्ये नाराजीचा सूर आहे.

महापालिकेचे डोंबिवलीत शास्त्रीनगर रूग्णालय आहे. रुग्णालयात अनेक गरीब महिला प्रसूतीसाठी येत असतात. मात्र त्या महिलेची प्रसुती झाल्यानंतर बाळाला दाखवण्यासाठी या रुग्णालयात काही कर्मचारी गरीब रुग्णांकडे पैशाची मागणी करतात. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. आनंद झाल्याने अनेकजण खुशीने पाचशे ते हजार रूपये देतात. पण ज्या रूग्णांच्या नातेवाईकांची ऐपत नसते ते इतके पैसे देण्यास नकार देतात. कमी पैसे घ्या अशी विनवणी करतात. पण रूग्णालयातील कर्मचारी हे अडून बसतात. त्यामुळे गाेरगरीब रूग्णांची आर्थिक अडचण होते. आर्थिक स्थिती बेताची असल्याने पालिकेच्या रूग्णालयात प्रसुतीसाठी येतात पण तेथेही पैशाची मागणी होत असल्याने गरीब रूग्णांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वागणूकीविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

परिपत्रकाला केराची टोपली

गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे लूटमार सुरू असल्याच्या तक्रारी अनेक रूग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारे काही दिवसांपूर्वी प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर सावकारे यांनी सर्व वाॅड इन्चार्ज, शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग आणि मेट्रन यांना परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची ताकीद दिली हाेती. हे प्रकार सुरूच असल्याने रूग्णांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे परिपत्रकाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे.

रूग्णालयात असा प्रकार घडणे चुकीचा आहे मात्र तथ्य आढळल्यास अशा कर्मचा-यावर तातडीने कारवाई करण्यात येईल
– मिलींद धाट, उपायुक्त केडीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -