घरमुंबईबोर्डाच्या कार्यालयात विद्यार्थी, पालकांची गर्दी

बोर्डाच्या कार्यालयात विद्यार्थी, पालकांची गर्दी

Subscribe

दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, परीक्षेसंदर्भातील विविध समस्यांबाबत वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात गुरुवारी शेवटच्या क्षणाला विद्यार्थी व पालकांनी एकच गर्दी केली होती. परीक्षा केंद्र बदलणे, लेखनिक उपलब्ध करून देणे, काही दिवसांपूर्वी अपघात होऊन जखमी झालेल्या विद्यार्थ्याला सवलत मिळावी, अद्याप हॉलतिकीट मिळाले नाही, गतिमंद विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा मिळावी या समस्यांचा समावेश आहे. राज्यातील 22 हजार 244 शाळांमधून 16 लाख 41 हजार 568 विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलला असल्याने जुन्या अभ्यासक्रमानुसार होणार्‍या परीक्षेसाठी राज्यातून 59 हजार 245 विद्यार्थी बसले आहेत. ही परीक्षा चार हजार 874 परीक्षा केंद्रावर होणार आहे.

परीक्षेसंदर्भातील विविध अडचणी सोडवण्यासाठी पालघर, अलिबाग, कल्याण, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई, कर्जत येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक गुरुवारी मंडळाच्या कार्यालयात ठाण मांडून बसले होते. अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्र घर किंवा शाळेजवळ न आल्याने तो बदलून मिळावा यासाठी अर्ज करण्यासाठी आले होते, तर काही विद्यार्थ्यांचे पालक हे त्यांच्या पाल्याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला असून, त्याला पेपर लिहण्यात अडचण येत आहे. यासाठी लेखनिक मिळावा किंवा अपघातामुळे मुलाला चालता येत नसल्याने घराजवळील परीक्षा केेंद्र मिळावे यासाठी आले होते. त्याचप्रमाणे अनेक गतिमंद मुलांना लेखनिक मिळावा यासाठीही त्यांचे पालक आले होते. काही विद्यार्थ्यांनी त्यांना अद्याप हॉलतिकीट मिळाले नसल्याचे सांगत मंडळाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना उशिरा हॉलतिकीट मिळालेले होते, तर अनेकांना परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भातील प्रक्रियेची माहिती उशिरा कळल्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी मंडळाच्या कार्यालयात आल्याचे विद्यार्थी व पालकांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा नियमानुसार आम्ही प्रयत्न करत आहोत. कोणत्याही मुलाचे वर्षे फुकट जाणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.
– कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष, मुंबई विभाग, एसएससी बोर्ड

हेल्पलाईन क्रमांक
विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात येणार्‍या अडचणीसाठी शिक्षण मंडळाकडून विभागीय मंडळनिहाय हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे 9423042627, नागपूर 0712-2564403, औरंगाबाद 0240-27893756, कोल्हापूर 0231-2696101, अमरावती 0721-2662608, नाशिक 0253-2592143, लातूर 02382-251633, कोकण 02352-228480

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -