घरमुंबईदुष्काळ, शेतकरी आत्महत्यावरुन सरकारला घेरणार

दुष्काळ, शेतकरी आत्महत्यावरुन सरकारला घेरणार

Subscribe

काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा इशारा

भाजप शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार असल्याचा इशारा रविवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरर्गे यांनी दिला. तर आगामी निवडणूकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी यावेळी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी दादर येथील टिळक भवन येथे सुरु करण्यात आलेल्या वॉर रुमचे मल्लिकार्जुन खरर्गे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व वॉर रूमचे प्रमुख अविनाश पांडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे सहप्रभारी चेला वामशी रेड्डी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, वॉर रूमचे समन्वयक अभिजीत सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी माध्यमांशी बोलताना खर्गे म्हणाले की, अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली अद्यावत वॉर रूमच्या माध्यमातून विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचे नियोजन आणि समन्वय साधला जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून स्टार प्रचारकांच्या सभांचा समन्वय, सोशल मिडीयावरील प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत व सल्ला दिला जाणार आहे. तर आरेमधील वृक्षतोडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणा-या मुंबईकरांना, तरूण विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे. डिस्कव्हरी चॅनलच्या मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये मोदीजींनी आपल्या काकांना लाकडाचा व्यवसाय करायचा होता पण आजीने वृक्षामध्ये जीव असतो लाकडाचा व्यवसाय करू नको, असे सांगितले होते. याची आठवण करून देत आपण पर्यावरणाबाबत किती संवेदनशील आहोत हे पंतप्रधानांनी त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि अटक केलेल्या तरूण आणि विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश द्यावेत असे खर्गे म्हणाले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी काँग्रेसची वॉर रूम सज्ज आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका मतदारापर्यंत पोहचणे आणि प्रचाराचे समन्वय साधण्याचे काम केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यभरात स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. वॉर रूमच्या माध्यमातून सोशल मिडीया आणि इतर माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक जोरदार पध्दतीने प्रचार अभियान राबवेल असे त्यांनी जाहीर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -