घरमुंबईवाढत्या महागाईचा फटका मंत्रालयाच्या झेंड्यालाही

वाढत्या महागाईचा फटका मंत्रालयाच्या झेंड्यालाही

Subscribe

झेंड्याच्या देखभालीसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद

मुंबईसह देशात वाढत अलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. या महागाईच्या कचाट्यातून मंत्रालयाच्या राष्ट्रध्वजाची ही सुटका झालेली नसल्याचे चित्र दिसून आले आहे. वाढत्या महागाईमुळे राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणार्‍या कापडासह इतर गोष्टींच्या दरात ही वाढ झाल्याने मंत्रालयातील झेंड्याला त्याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. या वाढत्या महागाईची गंभीर दखल राज्य सरकारने घेतले असून या राष्ट्रध्वजाच्या खरेदी आणि देखरेखीसाठी होणार्‍या खर्चात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रध्वजाच्या खर्चासाठी सुमारे २५ लाखांचा निधींची तरतूद करण्यात आली आहे. या अगोदर हा खर्च १० लाख इतका मर्यादित होता.

राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय कामे मंत्रालयातून पूर्ण केली जातात. त्यामुळे राज्याच्या जडणघडणीत मंत्रालयाला वेगळे असे महत्व प्राप्त झाले आहे. अशा या मंत्रालयावर दररोज आपल्या राष्ट्रध्वज फडकाविला जातो. वर्षभर याठिकाणी राष्ट्रध्वज फडकविला जातो. ऊन, वारा, पावसाळ्यातील अतिवृष्टी व वेगवान वाहणारे वार्‍यांमुळे या राष्ट्रध्वजाला फटका बसतो. त्यामुळे बर्‍याचवेळी राष्ट्रध्वज फाटतो. त्यामुळे प्रशासनाला नव्याने झेंडा खरेदी करावा लागतो. वर्षभरात अनेकवेळा राष्ट्रध्वज खरेदी केला जातो, पण गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या महागाईमुळे या झेंड्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणार्‍या खादी कापडाचे दर वाढले आहेत.

- Advertisement -

त्याचबरोबर इतर रसायने, रंग, मजूरी या सर्वांच्या खर्चात वाढ झाल्याने या राष्ट्रध्वज खरेदीला फटका बसत असल्याने राज्य सरकारने यासाठीच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून १० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र हा निधी अपुरा पडत असल्याने हा निधी आता २५ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार २५ लाखांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतुद करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला या निर्णयाची कार्यवाही करण्याची सूचनाही देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -