घरमुंबईपर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक संशोधने

पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक संशोधने

Subscribe

मुंबईतील शाळकरी मुलांच्या प्रकल्पांचे प्रदर्शने

प्लास्टिकचा पुनर्वापर, ऑक्सिजन विरहीत प्लास्टिक जाळल्यास प्रदूषण होत नाही, घरगुती तेलाचे बायोडिझेलमध्ये रुपांतर करून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर तोडगा, दुष्काळावर मात करण्यासाठी संत्र्याचा उत्तम शोषक म्हणून वापर यांसारख्या विविध विषयांवर मुंबईतील नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून प्रकल्प तयार केले आहेत. संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी सायनमधील साधना विद्यालयात विशेष शिबिर भरवण्यात आले होते. मुंबईतील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाची 27 ते 31 डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथे होणार्‍या राष्ट्रील बाल विज्ञान परिषदेसाठी या प्रकल्पांची निवड झाली आहे. या निवड झालेल्या प्रकल्पांसंदर्भात ‘आपल महानगर’ने घेतलेला आढावा.

अरविंद गंडभीर शाळा, जोगेश्वरी
प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे सार्‍या जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जोगेश्वरीतील अरविंद गंडभीर या शाळेने ‘कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ इनोव्हेटिव्ह रियूज ऑफ प्लास्टिक अ‍ॅण्ड टेट्रापॅक’ या प्रकल्पांतर्गत प्लास्टिक आणि टेट्रापॅकचा पुनर्वापर करण्यावर भर दिला. जेणेकरून प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण टाळण्याबरोबरच त्यापासून होणार्‍या कचर्‍यातून चांगल्या गोष्टी बनवण्यावर भर देता येऊ शकतो. गंडभीर शाळेची प्रकल्पाची गटप्रमुख असलेल्या गुंजन सागवेकर व पूजा दिवेकर या विद्यार्थिनींनी शिक्षिका विद्या रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पावर काम केले. यामध्ये त्यांनी प्लास्टिक व टेट्रापॅकपासून विटा, पत्रे, रस्ता बनवले व त्याचा तुलनात्मक अभ्यास केला असता प्लास्टिकचा वापर करून बनवलेल्या वस्तू या अधिक टिकाऊ व स्वस्त असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. तसेच ऑक्सिजनविरहित खोलीत प्लास्टिक वितळवण्यात आले तर प्रदूषण होत नसल्याचाही निष्कर्ष या प्रकल्पातून त्यांनी मांडला आहे.

- Advertisement -

साधना विद्यालय, सायन
डिझेल व पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महागाईही झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक यासारखी अनेक कारणे असली तर कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर हेही एक कारण आहे. गेल्या दशकभरात मुंबईमध्ये 14 दशलक्ष वाहने रस्त्यावर आली आहेत, तर दरवर्षी ८ हजार 169 टन इतके डिझेल महाराष्ट्रात वापरले जाते. या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाढणारे प्रदूषण हे आरोग्यास घातक आहे. ही बाब लक्षात घेऊन सायनमधील साधना विद्यालयाने इंधनाला नवा पर्याय शोधणारा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये साधना विद्यालयातील शिक्षिका सिद्धी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निधी गुप्ता, अबुसय्यद अन्सारी व अश्फिया खान यांनी बायोडिझेलच्या पर्यायावर सखोल अभ्यास केला. यामध्ये त्यांनी जेवणानंतर शिल्लक राहिलेले तेल हे वापरात येत नाही. त्यामुळे साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या तेलाचा वापर करून बायोडिझेल व ग्लिसरिन बनवले. जनरेट व स्टोव्हमध्ये या बायोडिझेलचा वापर करता येऊ शकतो, असा निष्कर्ष काढला. प्रत्येक महिन्याला मुंबईतील हॉटेलमध्ये चार हजार लिटर तेलाचा वापर करण्यात येतो. त्यातील 1200 लिटर तेल वाया जाते. त्यामुळे या तेलाचा वापर करून इंधनाला पर्याय बनवता येऊ शकते, असा निष्कर्ष त्यांनी मांडला.

स्वाध्याय भवन शाळा, माटुंगा
हेवी मेटल कंपन्यांचे कारखाने असलेल्या ठिकाणी पर्यावरणात मोठ्या प्रमाणात मेटल टॉक्सिस सोडण्यात येते. पर्यावरणामध्ये सोडण्यात येणार्‍या धातूमुळे गंभीर समस्या उद्भवतात आणि मानवी आरोग्य व प्राणी, पक्षांचे आरोग्य धोक्यात येत आहे. भारतासह जगातील सर्वच देशांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धातूचे प्रदूषण हे सर्वांसाठी एक प्रकारचे चिंतेेचे कारण बनले आहे. यावर माटुंगामधील स्वाध्याय भवन शाळेतील शिक्षिका संध्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानी शहा व जिनांश दलाल या विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयर केला आहे. या प्रकल्पामध्ये त्यांनी हेवी मेटल प्रदूषणाचा मानव व पिकांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला. यामध्ये त्यांनी पीबी (एनओ3) 2 आणि एचजीसीएल 2 वापरुन 10 पीपीएम, 20 पीपीएम, 30 पीपीएम लीड मात्रा दूषित होत असल्याचे समोर आले. यामध्ये असे दिसून आले की, जड धातू आणि नियंत्रणाने उपचार केलेल्या वनस्पतींच्या उंचीमध्ये फरक दिसून आला. काही झाडांची पाने पिवळी झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

जे.जे. अ‍ॅकेडमी हायस्कूल, मुलुंड
संत्र्याच्या उत्तम शोषक म्हणून वापर करून दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी साचवण्यावर मुलुंडमधील जे.जे. अ‍ॅकेडमी हायस्कूलच्या आर्यन शेठीया व वृत्ती पटेल यांनी शिक्षिका गायत्री राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प तयार केला. सध्या दुष्काळामुळे शेतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी शोषून घेण्यासाठी ते थांबवून ठेवण्यासाठी जे.जे. अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी संत्र्याचा वापर केला. माती व संत्र्याच्या साल यांचे मिश्रण करून ते जमिनीमध्ये टाकल्यास संत्र्याची साल पाणी शोषून घेऊन ते साठवून ठेवते. त्यामुळे जमिनीची आद्रता वाढण्यास मदत होते व पिकांना चांगल्याप्रमाणात पाणी मिळते. जेणेकरून पिकांची वाढ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे संत्रे हे एक उत्तर बायोडिग्रेडेबल सुपरअ‍ॅर्ब्जाब असल्याने त्याचा वापर डायपर किंवा सॅनिटरी पॅडमध्येही करता येऊ शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक चाचण्या केल्या. या चाचण्यामधून संत्र्यापासून बनवलेले सॅनिटरी पॅड हे रासायने वापरून बनवलेल्या सॅनिटरी पॅडपेक्षा उत्तम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्ही.पी.एम. विद्यामंदिर, दहिसर
शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रत्येकजण पाण्यामध्ये प्युरिफिकंटचा वापर करतो. त्यामुळे पाण्यामध्ये असलेला मॉयना हा जीव मरतो. मॉयनाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनच्या पातळीनुसार त्याच्या रंगामध्ये बदल होत असतो. ऑक्सिजनची पातळी कमी असल्यावर त्याचा रंग लाल होतो. त्यामुळे व्ही.पी.एम विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका रेश्मा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती देशपांडे व आयुश शितूत या विद्यार्थ्यांनी मॉयना या जीवाणूबाबत अभ्यास केला. यासाठी त्यांनी दहिसर नदीतील पाण्याचे ठिकठिकाण नमूने घेतले. या पाण्यामध्ये मॉयना कितीकाळ जिवंत राहू शकतो हे पाहिले असता नळाच्या पाण्यामध्ये मॉयना हे जीवाणू मरत असल्याचे लक्षात आले. मुंबईमध्ये पाण्याच्या शुद्धिकरणासाठी क्लोरिनचा वापर करण्यात येतो. क्लोरिनमुळे हे जीवाणू मरत असल्याचे स्पष्ट झाले. परंतु शुद्धीकरणासाठी तुरटीचा वापर केल्यास या जीवाणूना काहीच होत नसल्याचे दिसून आले. मॉयनाप्रमाणे अनेक असे जीवाणू आहेत जे प्युरिफिकंटचा वापर केल्याने मरत असल्याचे दिसून आले. प्युरिफिकंटच्या वापराने हे जीवाणू मेल्याने अन्न साखळीत व्यत्यय येऊ शकतो, असा निष्कर्ष विद्यार्थ्यांनी काढला.

डॉन बॉस्को हायस्कुल, माटुंगा
कचरा हा सध्या मुंबईतील सर्वात मोठी समस्या आहे. कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेकडून काही योजनाही राबवण्यात आल्या आहेत. तसेच काही सोसायट्यांना स्वत: कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे बंधनकारक केले आहे. परंतु त्याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने डॉन बॉस्को शाळेतील जेफ्री नाडर, कायल रोझारियो, मालकोल्म मॉन्येरटे, इलिजाह मॅकोडो, नेस मॅडोट या विद्यार्थ्यांनी शिक्षिका अनिता फिलिप यांच्या मार्गदर्शनाखाली बायोप्लास्टिक प्रकल्प केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच परिसरातून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केल्यास त्यावर प्रक्रिया करणे सोईस्कर होते. हवा, पाणी व माती याचे होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होऊ शकते, हे नागरिकांना पटवून दिले. तसेच हा जमा केलेल्या कचर्‍यापासून उत्तम खत बनवता येऊ शकते व प्लास्टिकचा कचरा वेगळा गोळा केल्यास त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तो सिमेंट कारखान्यांकडे पाठवता येतो. हे नागरिकांना पटवून दिले. यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडीओ बनवण्याबरोचर सोशल मिडियाच्या माध्यमातूनही प्रचार केला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन सर्व्हेही केला आहे.

सेंट जॉन हायस्कूल, बोरिवली
ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोळसा, हवा, पाणी यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केला जातो. पण या नैसर्गिक स्त्रोतांपासून बनवण्यात येणार्‍या ऊर्जेसाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे नागरिकांना महागड्या दराने वीज मिळते. याचा परिणाम शेतीपासून उद्योगांवर होत असतो. ही बाब लक्षात घेऊन बोरिवली पश्चिमेकडील सेंट जॉन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी झाडांच्या पानांपासून ऊर्जा बनवण्याच्या प्रकल्प केला आहे. शिक्षिका मनाली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विवेककुमार यादव, मनस्वी ठाकेर या विद्यार्थ्यांनी स्वस्त ऊर्जा मिळवण्यासाठी संशोधन केले आहे. यामध्ये त्यांनी झाडांच्या पानामध्ये असलेल्या क्लोरोफिलचा वापर केला आहे. झाडाची पाने रात्रभर इथेनॉलमध्ये भिजत ठेवल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यामध्ये असलेले क्लोरोफिल हे वेगळे होते. या वेगळे झालेल्या क्लोरोफिलमध्ये विद्युतवहन करणारे रॉड टाकून त्याला जोडलेला बल्ब पेटल्याचे विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातून समोर आले. अशाप्रकारे वीजनिर्मिती केल्यास भविष्यात शेतकरी त्यांच्या शेतातील टाकाऊ वस्तूंपासून सहज ऊर्जा निर्मिती करू शकतात, असे शिक्षिका मनाली राऊत यांनी सांगितले. या प्रकल्पावर जुलैपासून हे विद्यार्थी काम करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -