घरमुंबईतब्बल 12 वर्षांनंतर ‘दो हंसो का जोडा ’ पुन्हा एकत्र

तब्बल 12 वर्षांनंतर ‘दो हंसो का जोडा ’ पुन्हा एकत्र

Subscribe

डॉ. जितेंद्र आव्हाड - प्रताप सरनाईक सामंजस्य पर्वाला ठाण्यात सुरुवात , वर्तकनगर पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने दोघे एकत्र

ठाणे – तब्बल बारा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 पूर्वी ठाण्यातील राजकारणात जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक म्हणजे ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 साली प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या वादावरून राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेचा रस्ता धरला आणि त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्यातील मैत्री राजकारणामुळे दुभंगली गेली. मात्र, आता तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या पुनर्निर्माणाच्या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि ओवळा माजिवडा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे एकत्र आले आणि दोघांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. त्यामुळे ठाण्यात सरनाईक – आव्हाड यांच्यातील कटुता कमी होऊन पुन्हा सामंजस्य पर्व सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

2008 साली प्रताप सरनाईक यांच्या समता नगरमधील हॉटेलमध्ये ते राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि ती होण्यापूर्वी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे प्रताप सरनाईक यांची समजूत घालण्याकरता हॉटेलमध्ये स्वतः आले होते. सरनाईक हे त्यावेळी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नगरसेवक होते. ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे दुसरे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या नावाची चर्चा होती. बरोबर एक वर्षांनी म्हणजे 2009 साली विधानसभेची निवडणूक होती. त्यामुळे त्यावेळी जो ठाणे महापालिकेचा विरोधी पक्षनेता होईल त्याला ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार हे निश्चित होते.

- Advertisement -

राष्ट्रवादीमधून प्रताप सरनाईक आणि हनुमंत जगदाळे हे दोघेही आमदारकीसाठी इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत मतभेदातून पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रताप सरनाईक यांच्या ऐवजी हनुमंत जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा मजबूत राजकीय गॉड फादर जिवलग मित्र असतानाही विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याला डावलले गेल्यामुळे सरनाईक हे प्रचंड नाराज झाले. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादीत राहिल्यास आपल्याला आमदार होणे शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे प्रताप सरनाईक यांनी आव्हाड यांच्या मनधरणीनंतरही शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्या काही दशकांच्या मैत्रीत खंड पडला. त्यानंतर मोजके खाजगी कार्यक्रम वगळता कोणत्याही राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक पुन्हा कधीही एकत्र आलेले ठाणेकरांना दिसले नाहीत.

त्यानंतर प्रताप सरनाईक 2009, 2014 आणि 2019 साली तब्बल तीनवेळा ओवळा-माजीवाड्यातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये सुदैवाने राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे राज्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्रिपद आले. प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील वर्तक नगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाला गती मिळाली. 2014 सली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतरही प्रताप सरनाईक हे वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील होते.

- Advertisement -

त्याबाबत कालच मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अंतिम मान्यता मिळाली. त्यामुळे बारा वर्षांपूर्वी राजकारणामुळे दुरावलेल्या या दोघा मित्रांना पुन्हा एकदा वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी उपलब्ध झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -