घरमुंबईकल्याणचे आधारवाडी कारागृह हाऊसफुल

कल्याणचे आधारवाडी कारागृह हाऊसफुल

Subscribe

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आल्याने हे कारागृह हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे नव्या कैद्यांना ठेवणार कुठे, असा प्रश्न तुरूंग प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे नव्याने भरती होणार्‍या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागॄहात पाठवले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहाच्या दुरूस्ती आणि विस्तारीकरणाचा प्रस्ताव सरकारच्या लालफितीत अडकल्याने तुरूंग प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आधारवाडी कारागृहाची क्षमता ५४० असताना तिथे १४०० कैद्यांना ठेवण्यात येत आहे.

१९७६ साली कल्याणामध्ये ९ हेक्टर जमिनीवर आधारवाडी जेल बांधण्यात आला आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, बदलापूर, वांगणी, कर्जत, टिटवाळा, शहापूर या परिसरातील आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा झाल्यानंतर त्यांची आधारवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात येते. आधारवाडी तुरूंगाची कैदी ठेवण्याची क्षमता ५४० इतकी आहे. त्यात महिला कैदी क्षमता ३५ आहे. मात्र आजमितीला कारागृहात जवळपास १४०० कैदी असून त्यात ११४ महिला कैदी आहेत. या महिला कैद्यांची २३ मुलेदेखील त्यांच्यासोबत आहेत. कारागृह क्षमतेपेक्षाही तिप्पट कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आले आहेत. कारागृहात कैद्यांना झोपण्यासाठीही जागा नसल्यामुळे कैद्यांमध्येदेखील वाद होत असतात.

- Advertisement -

या सगळ्याचा भार कारागृह प्रशासनावर पडत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीत घडलेल्या घटनातील आरोपींना जागेअभावी ठेवण्यास तुरूंग प्रशासनाकडून नकार देण्यात आला. त्यामुळे या आरोपींची रवानगी नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. त्यामुळे नव्याने कोणताही कैदी आल्यास त्याला तळोजा जेलमध्ये पाठवले जाते.

- Advertisement -

तळोजा ठाणे मध्यवर्ती कारागृह आर्थररोड आणि आधारवाडी अशी चार मोठी कारागृहे आहेत. मात्र शहरातील गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने दररोज शिक्षा होणार्‍या कैद्यांची संख्या वाढत आहे. या कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृहात पुरेसे बरॅक नसल्याने येथे कैद्यांना कोंबले जाते. कल्याण व आजूबाजूच्या परिसरातील वाढत्या गुन्ह्यांमुळे कैद्यांची संख्या वाढत आहे. काही प्रकरणात कैद्यांना जामीन होत नाही तर काहींना जामीन करण्यासाठी कोणीच नसतो. त्यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असते. या कारणांमुळेही कैद्यांची संख्या वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात आधारवाडी हा एकमेव जेल होता, त्या ठिकाणी महिला कैदींना ठेवले जायचे. आता ठाणे कारागृहातही महिला कैद्यांना ठेवले जाते. या कारागृहाची क्षमता वाढविण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र सरकारदरबारी त्याला अजूनही यश मिळालेले नाही.

कारागृहाच्या आजूबाजूला असलेला भूखंड जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने पालिकेकडून कारागृहाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारागृहातील बॅराकीची संख्या वाढविली जाणार आहे. या कारागृहातदेखील तळोजा कारागृहाप्रमाणे अंडासेल तयार केला जाणार असून तसा प्रस्ताव विचाराधीन आहे. कल्याण उल्हासनगर तसेच आजूबाजूच्या न्यायालयात न्यायालयीन कोठडी ठोठावलेल्या कैद्यांची रवानगी थेट आधारवाडी कारागृहात केली जाते. त्यामुळे कैद्यांची संख्या वाढत आहे. त्या प्रमाणात जामिनावर सुटणार्‍या किंवा शिक्षा भोगून तुरूंगाबाहेर पडणार्‍या कैद्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे तुरूंगातील कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी तुरूंगाधिकार्‍यांना काम सांभाळणे अवघड बनले आहे.

क्षमता ५४०, कैदी १४००

कारागृहातील कैद्यांची क्षमता ५४० असून सध्या १४०० कैदी आहेत. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. कारागृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर विस्तारीकरण करण्याचे विचाराधीन आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे
-भारत भोसले, तुरूंगाधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -