घरमुंबईकल्याणात स्वच्छता मार्शलकडून सामान्य नागरिकांची लूटमार, प्रशासन गप्पच!

कल्याणात स्वच्छता मार्शलकडून सामान्य नागरिकांची लूटमार, प्रशासन गप्पच!

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने कंत्राट दिलेल्या एजन्सीच्या क्लीनअप मार्शल्सकडून लुटमार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर क्लीनअप मार्शल्सवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने दोन ठेकेदारांमार्फत स्वच्छता मार्शल नेमले आहेत. मात्र, या मार्शलकडून नागरिकांना शहर स्वच्छतेसाठी प्रवृत्त करण्याऐवजी दंडात्मक कारवाईच्या नावाखाली जोरदार वसुली सुरू केली आहे. ग्रामीण भागातील अथवा नवख्या प्रवाशाला लक्ष करत अस्वच्छता केल्याचे खोटे नाटे सांगून पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी करूनसुद्धा अधिकारी डोळे झाक करत आहेत. गुरूवारच्या महासभेतही शिवसेनेचे नगरसेवक सुधीर बासरे यांनी मार्शलच्या वसुलीबाबत सत्ताधारी आणि प्रशासनाची चांगलीच कानउघाडणीही केली.

नेमणुकीपासूनच मार्शल वादाच्या भोवऱ्यात

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून महासभेच्या मान्यतेने ऑगस्ट २०१९ पासून कल्याण शहरासाठी ओरोकॉन आणि डोंबिवलीसाठी सिंग सिक्युरिटी या दोन एजन्सीची शहरात स्वच्छता मार्शल नेमण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर कल्‍याण मधील अ, ब, क तसेच डोंबिवली येथील फ आणि ग प्रभागात स्‍वच्‍छता मार्शलची नेमणूक केली. सिंग आणि ओरियन एजन्सीमार्फत १०० स्‍वच्‍छता मार्शल नेमण्‍यात आले आहेत. शहर स्वच्छतेबाबत जनजागृतीसह शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दंड ठोठावून पावती देण्याचे काम या मार्शलना देण्यात आले असून, जमा झालेल्या रकमेतील ६३ टक्के रक्कम पालिकेला देत ३७ टक्के रक्कम ठेकेदाराला देण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. मात्र नेमणुकीपासूनच हे मार्शल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीची आणि स्वच्छता मार्शलच्या लुटमारीसंदर्भात सखोल चौकशी करण्यात येईल. स्वच्छता मार्शलकडून सर्वसामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल किंवा त्यांची लुटमार केली जात असेल, तर संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, केडीएमसी

- Advertisement -

मार्शलची यादीच नाही

काही महिन्यांपूर्वी दंडाच्या चौपट रक्कम वसूल करणाऱ्या मार्शल विरोधात पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता मार्शल नागरिकांना अस्वच्छता करण्यापासून परावृत्त करण्याऐवजी त्यांना गुन्हा करण्यास उद्युक्त करतात आणि गुन्हा घडताच त्यांच्याकडून दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. मार्शल यांना पालिकेचा बॅच असणारा युनिफॉर्म आणि एजन्सीचे ओळखपत्र सक्तीचे आहे. पोलीस व्हेरिफिकेशन करून मार्शल म्हणून कोण काम करणार आहेत, त्यांची नावे पालिकेला देणे ठेकेदाराला सक्तीचे आहे. मात्र, ठेकेदाराने ही यादीच दिलेली नाही.

मार्शलच्या दादागिरीला आळा घालण्याची मागणी

हे मार्शल एका ठिकाणी न थांबता सार्वजनिक ठिकाणी फिरून जनजागृतीचे काम बाजूला ठेऊन मार्शलांनी कल्याण रेल्वे स्थानकावरील स्कायवॉक, दीपक हॉटेल, बस डेपोच्या स्कायवॉकवर आपला अड्डा बनवला असून एखादा ग्रामीण भागातील किंवा नवखा प्रवासी हेरून ‘तुम्ही पान खाऊन थुंकला, तुमच्या खिशात गुटखा सापडला’ अशा या-ना त्या कारणाने त्याची जबरदस्तीने अंगझडती घेतात. ‘एक हजार पाचशे रूपये द्या नाही तर अटक करू’ असे म्हणत खिशात जितके पैसे असतील तितके हिसकावून घेतात. याबाबत पालिकेकडे ढीगभर तक्रारी करण्यात आल्या असून या मार्शलच्या दादागिरीला आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -