घरमुंबईवायू प्रदूषणामुळे लहान मुलांच्या आजारात वाढ

वायू प्रदूषणामुळे लहान मुलांच्या आजारात वाढ

Subscribe

नवी मुंबईकरांना वायू प्रदूषणाचा भयंकर त्रास होत असून लहान मुलांमध्ये श्वसन विकारांत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या वायू प्रदूषणामुळे लहान मुलांच्या आजारात वाढ होत असल्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

नवी मुंबईच्या लगत असलेल्या दगडखाणी, शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर तसेच पनवेल ठाणे मार्गावर वाढलेली प्रचंड वाहतूक आणि तळोजा येथील रासायनिक कारखान्यांचा हलगर्जीपणा यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या या परिसरात वायू प्रदूषण पातळीत कमालीची वाढ झाल्याचे समोर आले आहे. या बायू प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ब्रॉन्कायाटिस, न्युमोनिया आणि दमा विकारांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

हवेमध्ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे म्हणजे वायू प्रदूषण. वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या आरोग्यसमस्या उद्भवतात. लहान मुलांमध्ये प्रतिकार शक्ती ही फारच कमी असते अशावेळी हवेत तरंगणारे कण स्वरूप पदार्थ (एसपीएम)- धूर, धूळ, आणि वाफ या स्वरूपात त्यांच्या शरीरात गेल्यास अंधुक दिसणे, द‍ृष्टी मंदावणे असे त्रास होतात. श्वसनातून हे कण फुफ्फुसात जाऊन सर्दी, खोकला, ब्रॉन्कायाटिस, न्युमोनिया, दमा, फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुले ही उघड्या जागेमध्ये म्हणजेच शाळेत येता जाता – शाळेच्या आवारात, मैदानात खेळतांना हवेच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे त्यांना जास्त धोका असतो.  – डॉ. भरत जग्यासी, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरचे जेष्ठ इंटेन्सिव्हिस्ट

- Advertisement -

यामुळे जास्त वायू प्रदूषण होते

नवी मुंबई, ठाणे शहरांमध्ये वाढलेल्या दुचाकी आणि चारचाकी हवेमधील कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईडची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवतात. सततची बांधकाम कामे, खराब रस्ते आणि जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धूळ हे सुद्धा वायू या प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. औष्णिक विद्युत केंद्रे, कागद कारखाने आणि धातू वितळवणारे कारखाने यातून सर्वात जास्त वायू प्रदूषण होते.

१० मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू वायू प्रदूषण

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सरासरी १० मुलांपैकी एका मुलाच्या मृत्युचे कारण हे वायू प्रदूषण असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आत्तापासून ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे, असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्या तज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केले.

- Advertisement -

मुंबईकर दम्यानेही त्रस्त

दमा हा गंभीर स्‍वरूपाचा (दीर्घकालीन) आजार सामान्‍यत: श्‍वसनमार्गाला आलेली सूज आणि श्‍वसनमार्ग रूंद झाल्‍याने होतो. श्‍वसनमार्गाला येणाऱ्या सूजेमध्‍ये काळानुरूप बदल देखील होऊ शकतो. मुंबईतील स्‍थानिक डॉक्‍टर्स दररोज दमा किंवा श्‍वसनविषयक आजाराने त्रस्त असलेल्या सरासरी ४० रुग्‍णांची तपासणी करतात. लहान मुलांमधील दम्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये देखील वर्षानुवर्षे वाढ दिसून येत आहे. २०१८ पासून ते आतापर्यंत गेल्‍या वर्षाच्‍या तुलनेत यंदाच्‍या वर्षात दम्‍याने पीडित मुंबईकरांच्‍या संख्‍येमध्‍ये २५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. वयाच्‍या काही टप्‍प्‍यामध्‍ये, मुख्‍यत: २० वर्षे वयाच्‍या आत एक तृतीयांश मुंबईकरांना दमा आजार होण्‍याचा धोका आहे. दरम्‍यान गेल्‍या काही वर्षांमध्‍ये इन्‍हेलेशन थेरपीचा वापर करणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्‍येमध्‍ये वाढ झाली आहे, तर दम्‍याने पीडित ७५ टक्‍के रुग्‍ण इन्‍हेलरचा वापर टाळत असल्याची ही गंभीर बाब समोर आली आहे.

दम्याचे निदान झालेल्या मुलांच्‍या संख्‍येमध्‍ये प्रचंड वाढ झाली आहे, एकूण संख्‍या जवळपास ५ दशलक्षांवर पोहोचली आहे. शहरातील वाहतूक, वायू प्रदूषण आणि धुलिकण हे दमा होण्‍यास प्रमुख कारणीभूत घटक आहेत. मुलांपेक्षा पुरूष आणि महिलांमध्‍ये या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि इन्‍हेलेशन थेरपीचा वापर करण्‍यासंदर्भात देखील गैरसमज दिसून येत आहेत. दमा या सर्वात गंभीर आजाराची सतत काळजी घेणे आवश्‍यक आहे. माहिती आणि जागरूकतेच्‍या अभावामुळे अनेक लोकांना या आजाराची योग्‍य काळजी घेण्‍याचे समजत नाही. इन्‍हेलेशन थेरपी सुरू केलेल्‍या लोकांमध्‍ये देखील ३० ते ४० टक्‍के लोक मध्‍येच थेरपी थांबवतात. तसेच पालकांनी त्‍यांच्‍या मुलांना या आजाराची आणि आपत्‍कालीन स्थितीमध्‍ये कोणती काळजी घ्‍यावी, याची जाणीव करून देणे ही तितकेच गरजेचे आहे.  – डॉ. सुशांत माने, सर जेजे हॉस्पिटलमधील पेडिएट्रिशियन


वाचा – उल्हासनगरमधील नागरिक प्रदूषणामुळे त्रस्त

वाचा – दिल्लीत प्रदूषणाचा विळखा; राजपथ परिसर धुरकट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -