घरमुंबईबदलापूर परिसरात बिबट्याचा वावर

बदलापूर परिसरात बिबट्याचा वावर

Subscribe

बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याचा मृतदेह आढळल्यानंतर आता त्याच भागात बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे वनविभागाला आढळले आहेत.

बदलापूर परिसरात बिबट्याचा मृतदेह आढळून काही दिवस झाले नाहीत. तोच या भागातील आंबेशिव गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. या गावातील रामगिरी महाराजांच्या आश्रमाजवळ बिबट्याने एका गायीची शिकार केल्याचे आढळले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वांगणीजवळील ढवळेपाडा भागात मृत बिबट्या आढळला होता. तेव्हा येथील वन्यजीवांचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे लक्षात आले. तो बिबट्या उपासमारीने मरण पावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात आता आंबेशिव गावातील रामगिरी मठाजवळ बिबट्याचा वावर दिसला आहे. या भागातील शेळी आणि वासरांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत.

- Advertisement -

दीड वर्षांपूर्वी आढळला बिबट्यांचा वावर

अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसात येथे बिबट्यांचा वावर आढळला आहे. दीड वर्षांपूर्वी गुढी पाडव्याच्या दिवशी उल्हासनगरमध्ये भरवस्तीत बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर चामटोली गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर आढळून आला होता. अंबरनाथ तालुक्याच्या सीमेवरील मलंग गड ते माथेरान डोंगररागांच्या दरम्यान असलेल्या जंगलात बिबट्यांचा वावर असल्याचे पुरावे मिळाले आहेत. दोन बछडे, एक नर आणि मादीही या भागात असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले होते.

बिबट्याला जेरबंक करण्यासाठी सापळा

काही दिवसांपूर्वी बिबट्याने या भागातील एका वासराची शिकार केली होती. ग्रामस्थांनी त्वरित या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांना या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले. वन विभागाने बिबट्यासाठी सापळा रचला असून त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या बिबटयाचा वावर हा नैसर्गिक असला तरी बिबट्या गावाच्या हद्दीजवळ आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -