घरमुंबईमहानगर गॅस गळतीने घबराट 

महानगर गॅस गळतीने घबराट 

Subscribe

विज पुरवठाही खंडीत, स्वयंपाकाची बोंब

ऐन रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागात कोरम मॉलसमोरील सेवा रस्त्यावर मलनिःस्सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना जेसीबीचा फटका बसल्याने महानगर गॅसची वाहिनी फुटून वायू गळती झाल्याचा प्रकार घडल्याने हजारो ठाणेकर दिवसभर अक्षरश: गॅसवर होते. वायू गळती झाल्याने पाचपाखाडीसह इतर विभागातील घरगुती आणि हॉटेल्सना होणारा गॅस पुरवठा तातडीने रोखण्यात आला. तसेच अशावेळी कोणताही दुर्घटना होऊ नये म्हणून वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला. त्यामुळे अनेकांना सुट्टीच्या दिवशी घरी सहकुटुंब जेवणाचे बेत रद्द करावे लागले. सायंकाळपर्यंत गॅस वाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने कोरमकडे जाणारा सर्व्हिस रोड बंद होता. त्यामुळे मॉलमध्ये येणार्‍या ग्राहकांना वाट वाकडी करावी लागली.

हजारो घरातील शेगडी बंद
शहरात सध्या मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामादरम्यान नितीन कंपनी जंक्शनजवळील दर्यासागर हॉटेल समोरच घरगुती गॅस पुरवठा करणारी वाहिनी फुटली. त्यामुळे परिसरात गॅसचा उग्र वास पसरल्याने एकच गोंधळ उडाला. स्थानिक नगरसेवक अशोक वैती, उप विभागप्रमुख समाधान गोडसे – पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या हॉटेलचा वीजपुरवठा बंद करून येथील वाहतूक रोखली. परिसरही निर्मनुष्य केला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने फुटलेल्या महानगर गॅसच्या पाईप लाईनवर माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. शिवसैनिकांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.

- Advertisement -

घटनास्थळापासून अवघ्या दहा मिनिटांवर महानगर गॅसचे कार्यालय आहे. तरीही त्यांचे पथक पाऊण तासांनंतर येथे दाखल झाले. त्यानंतर पाईप लाईनच्या दुरुस्ती आधी या वाहिनीचा व्हॉल्व्ह शोधण्यासाठी पथकाची धावपळ झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. या गळतीमुळे तीन हात नाका, नितीन कंपनी जंक्शन, लुईसवाडी, पाचपाखाडी, संभाजीनगर, वैतीवाडी, अंबिकानगर, वर्तकनगरचा काही भाग या ठिकाणचा गॅस पुरवठा बंद झाला होता. दुपारी एक वाजता गॅस गळती झाली. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता गॅस पुरवठा पूर्ववत झाल्याचे महानगर गॅसच्या प्रतिनिधींनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -