घरमुंबईमाहिम येथील ज्वेलर्स लूटप्रकरण; मुद्देमालासह २ जणांना अटक

माहिम येथील ज्वेलर्स लूटप्रकरण; मुद्देमालासह २ जणांना अटक

Subscribe

राणाराम खुमाराम पुरोहित ऊर्फ नरेश ऊर्फ रणवीर आणि पुखराज शैतानराम भिल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहीम येथे दोन दिवसांपूर्वी भरदिवसा अभिषेक ज्वेलर्समध्ये झालेल्या लूटप्रकरणी पळून गेलेल्या नोकरासह दोघांना शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी वसई येथून शिताफीने अटक केली. राणाराम खुमाराम पुरोहित ऊर्फ नरेश ऊर्फ रणवीर आणि पुखराज शैतानराम भिल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, एक रिव्हॉल्व्हर, सहा जिवंत काडतुसे आणि कॅश असा एक कोटी नव्वद लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अशी घडली घटना 

भक्तीमल चुन्नीलाल जैन हे ७५ वर्षांचे वयोवृद्ध ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे माहीम येथील मोरी रोडवर अभिषेक ज्वेलर्स नावाचे एक सोन्या-चांदीचे दुकान आहे. याच दुकानात आरोपी राणाराम पुरोहित हा कामाला होता. गुरुवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास भक्तीमल जैन हे त्यांच्या दुकानात होते. काही वेळाने ते जेवणासाठी बसले. याच दरम्यान राणाराम हा कामानिमित्त बाहेर गेला. काही वेळाने तो त्याचा मित्र पुखराजसोबत दुकानात आला. या दोघांनी त्यांना मारहाण करुन नंतर त्यांचे दोन्ही हातपाय बांधले. त्यानंतर त्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, एक रिव्हॉल्व्हर, सहा जिवंत काडतुसे आणि कॅश असा मुद्देमाल पळवून नेला.

- Advertisement -

१ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

या घटनेची माहिती मिळताच माहीम पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. भक्तीमल जैन यांच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा नोंदवून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. तपास सुरु असतानाच या गुन्ह्यांतील दोन्ही आरोपी वसई परिसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर युनिट ५ च्या अधिकार्‍यांनी वसई येथून राणाराम पुरोहित आणि पुखराज भिल या दोघांना शिताफीने अटक केली. या दोघांनी अभिषेक ज्वेलर्समध्ये लुटमार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी साडेसहा किलो वजनाचे सोन्याचे दागिने, साडेनऊ किलो वजनाचे चांदीचे दागिने, ७ लाख ८६ हजार रुपयांची रोख रक्कम, एक रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसे असा १ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

३६ तासात आरोपींना अटक

दरम्यान, पोलीस तपासात राणारामने दुकानात नोकरीसाठी स्वतचे खोटे नाव सांगितले होते, तो तिथे रणवीर आणि नरेश या नावाने ओळखला जात होता. या गुन्ह्यांचा पुढील तपास माहीम पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. कुठलाही पुरावा नसताना या गुन्ह्यांचा ३६ तासांत पोलिसांनी छडा लावून दोन्ही आरोपींना चोरीच्या सर्व मुद्देमालासह अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -