घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात पाच वर्षांत १० भुकंपाचे हादरे

जिल्ह्यात पाच वर्षांत १० भुकंपाचे हादरे

Subscribe

नाशिक जिल्ह्यात २०१४ पासून आजतागायत १० वेळा भुकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात २०१४ पासून आजतागायत १० वेळा भुकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. ३.२ एवढ्या सर्वाधिक रिश्टर स्केलचा धक्का जानेवारी २०१४ मध्ये बसला होता. त्यानंतर आता पुन्हा दोन दिवसांपासून पेठ तालुक्यात भुकंपसदृश्य धक्के जाणवत असल्याने तेथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तहसीलदारांनी गावात भेट देऊन नागरिकांना सजगतेचे आवाहन केले. मात्र, आज झालेल्या भुकंपाच्या धक्क्याबाबत कोणतीही नोंद मेरी केंद्रात न झाल्याने प्रशासन बुचकळ्यात पडले आहे.

शुकवारी रात्री ९ वाजून ६ मिनिटांनी आमदाडोह भागात मोठा आवाज झाल्याने परिसरात हादरे बसल्याचे जाणवले. मेरी येथील भूकंप मापन केंद्रात २.१ रिश्टर स्केलचा धक्का जाणवल्याची नोंद आहे. यामुळे गोंदे, भायगाव, देवगाव, निरगुडे भागातील ग्रामस्थ सतर्क झाले. शनिवारी पहाटे ५ वाजून ५६ मिनिटांनी नाशिकपासून १२० किलोमीटर अंतरावर भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र मेरी येथील भूकंप आधार सामग्री पृथ्थकरण कक्षात त्याची नोंदच होऊ शकलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना जाणवले ते भूकंपाचे धक्के होते की अन्य आपत्ती याबाबत प्रशासकीय यंत्रणाच आता बुचकळ्यात पडली आहे. कळवण तालुक्यातील दळवट हे भुकंपाचे केंद्र मानले जात असले तरी त्याव्यतीरिक्त अन्य ठिकाणीही भुकंपाचे धक्के जाणवल्याच्या नोंदी आहेत. कळवणसह देवळा, बागलाण, पेठ आणि सुरगाणा या पाच तालुक्यांमध्ये पाच वर्षांत अनेकदा भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये १० वेळा भुकंपाचे धक्के जाणवले असून त्यापैकी निम्मे धक्के सायंकाळी सहा ते रात्री सव्वा नऊ कालावधीत जाणवले आहेत. चार धक्के सकाळी पावणेआठ ते सायंकाळी पाच या दरम्यान जाणवले असून २१ जुलै २०१५ रोजी मध्यरात्री साडेबारा ते पाऊणच्या दरम्यान पेठ आणि उमराळे येथे २.७ रिश्टर स्केल भुकंपाच्या धक्क्याची नोंद झाली होती. यापूर्वी ७ एप्रिल २०१५ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कळवण आणि अभोणा परिसरात २.८ रिश्टर स्केल भुकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक ३.२ रेश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का ७ जानेवारी २०१४ रोजी बसला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबर २०१६ रोजी कळवण तालुक्यात रात्री सव्वानऊच्या सुमारास ३.१ रेश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली होती.

- Advertisement -

२०१६ मध्ये पाच वेळा भूकंप

जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात भुकंपाचा एकही धक्का बसला नाही. भूगर्भातील हालचालींमुळे किरकोळ स्वरूपाचे धक्के जाणवले. परंतु, त्याची नोंद व्हावी इतकीही तीव्रता नव्हती. अंबानेर, पांडाणे, माळेदुमाला, उमराळे आणि कळवणमध्ये २०१६ मध्ये सर्वाधिक पाच वेळा १.७ ते २.८ रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के जाणवले. विशेष म्हणजे, १४ जून आणि २९ जुलै २०१६ रोजी एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या रिश्टर स्केलचे भूंकपाचे धक्के जाणवल्याच्या नोंदीही जिल्हा प्रशासनाकडे आहेत.

अर्लट सिस्टम नाहीच

भुकंपाची पूर्वसूचना देऊ शकेल अशी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे कार्यरत नाही. किंबहुना अशी यंत्रणा कुठेच कार्यरत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आपल्याकडे केवळ भुकंपाचे धक्के बसले तर त्याची तीव्रता किती होती याचे मोजमाप करून त्याची माहिती देणारीच यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी दिल्ली आणि कोलकाता येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी कळवण तालुक्यातील दळवट आणि तत्सम संवेदनशील गावांना भेट देऊन पाहणी केली. परंतु, भूकंपप्रवण क्षेत्रातील रहिवाशांनी कोणती काळजी घ्यायला हवी यावरच उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

नागरिकांनी घाबरू नये

नाशिक जिल्ह्यात जाणवलेले धक्के हे अतिशय सौम्य असून, त्यामुळे कोणतीही हानी संभवत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. – प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -