घरमुंबईबांधकामाला विरोध केल्याने वृद्धाची हत्या?

बांधकामाला विरोध केल्याने वृद्धाची हत्या?

Subscribe

भिवंडी तालुक्यातील भिवाळी येथे घरासमोर अंगणात बांधकाम केल्याच्या वादातून भांडण झाल्याने त्यात तरुणांच्या मारहाणीत एका वृद्ध नागरिकाचा वैद्यकीय उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना नुकतीच भिवाळी येथे घडली.
कान्हा पाटील (60) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

गणेशपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवाळीतील कान्हा पाटील यांचे राहते घर आहे. त्यासमोरील खुल्या जागेच्या अंगणात ओटा बांधण्याचे काम हाती घेतले होते. हे बांधकाम रस्त्यात अडथळा ठरत असल्याने त्या बांधकामाला विरोध करून बांधकाम बंद करण्यास सांगण्यात आले. मात्र, तरीही बांधकाम सुरूच ठेवल्याने 7 मार्च रोजी पंढरी मधुकर पाटील, मुकेश राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील,मंजित पाटील या चौघांनी हातात टिकाव ,फावडे घेऊन कान्हा पाटील यांच्या घरात घुसून बांधकाम तोडून टाकले. यावेळी कान्हा पाटील व त्यांचा मुलगा मंगेश याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वयोवृद्ध कान्हा पाटील यांना मुकेश याने पकडून ठेवले तर रवी पाटील, मंजित पाटील व पंढरी पाटील यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कान्हा पाटील यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील करीत आहेत.

- Advertisement -

चौघा हल्लेखोरांनी वृद्ध कान्हा पाटील व त्यांचा मुलगा मंगेश पाटील या दोघांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना अल्सरचा आजार असल्याने त्या आजाराने अथवा मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे का? याबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अहवालाचे अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे तूर्तास हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, वैद्यकीय अहवाल उपलब्ध होताच पुढील कारवाई केली जाणार आहे.
– परशुराम लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गणेशपुरी पोलीस स्टेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -