घरमुंबईमनसुख हत्याकांड प्रकरणात एनआयए लवकरच करणार मोठा खुलासा

मनसुख हत्याकांड प्रकरणात एनआयए लवकरच करणार मोठा खुलासा

Subscribe

चौकशीसाठी वाझे आणि माने यांच्या कोठडीची एनआयएची मागणी

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हत्याकांड प्रकरणात लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. या सर्व कटामागे असलेल्या सूत्रधाराची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे. यासाठी एनआयए अधिक चौकशीसाठी तुरुंगात असलेल्या आरोपीपैकी गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची २ तर सुनील माने याची पाच दिवसांची कोठडीची मागणी विशेष न्यायालयात केली आहे. दरम्यान सचिन वाझे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया लवकरच जेजे रुग्णालयात होणार असून यासाठी रविवारी काही चाचण्या पार पडणार असल्याचे समजते.

अंटालिया जवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ठेवण्यापासून ते मनसुख हिरेन हत्याकांड कटाचा खरा सूत्रधाराबाबत एनआयएच्या हाती काही पुरावे लागलेले आहे. लवकरच या कटाचा मुख्य सूत्रधार कोण होता हे उघडकीस होणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या सूत्रधाराबाबत अधिक चौकशी आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन वाझे आणि सुनील माने यांच्याकडे चौकशी करायची असल्यामुळे एनआयएकडून या दोघांचा तुरुंगातून ताबा घेण्यात येणार आहे. यासाठी एनआयएकडून विशेष न्यायालयात या दोघांची कोठडी मिळण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केली आहे. वाझेला २ दिवस तर माने याला ५ दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी एनआयएने न्यायालयात केली आहे. याच्यावर सोमवारी सुनावणी होणार असल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान मागील १४ दिवसांपासून सचिन वाझे यांच्यावर जे.जे रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याचे जवळजवळ निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे मत रुग्णालयाने व्यक्त केले आहे. यासाठी रविवारी सचिन वाझेवर काही चाचण्या करण्यात येणार असून उपचारादरम्यान सचिन वाझेची पत्नी मोहिनीला पती सचिन वाझेसोबत राहण्याची परवानगी मिळाली आहे.

२५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अंटालिया या घराजवळ गावदेवी पोलिसांना स्कॉर्पिओ ही कार मिळून आली होती. या कारमध्ये जिलेटीन कांड्या आणि धमकीचे पत्र मिळवून आले होते. दरम्यान या गाडीचा मालक मनसुख हिरेन त्याची ही कार विक्रोळी येथून चोरीला गेल्याचे त्याने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, हा सर्व बनाव असल्याचे समोर येत असल्याचे दिसताच मनसुख हिरेन याची मार्च महिन्यात हत्या करून त्याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे टाकून देण्यात आला होता.

- Advertisement -

या दोन्ही प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी एनआयए बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, सुनील माने, रियाजुद्दीन काझी, चकमक फेम प्रदीप शर्मा, बडतर्फ पोलीस शिपाई विलास शिंदे , क्रिक्रेट बुकी नरेश गोर, संतोष शेलार, सतीश जाधव आणि मनीष सोनी यांना अटक करण्यात आलेली असून हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -