घरमुंबईमराठा तरुणाचे प्रवेशाचे सर्व मार्ग बंद

मराठा तरुणाचे प्रवेशाचे सर्व मार्ग बंद

Subscribe

लढा आरक्षणासाठी नव्हे प्रवेशासाठी

मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातच प्रवेश मिळणार असल्याने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 70 विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यातून मिळणारे प्रवेश नाकारले. मात्र आता मराठा आरक्षणच अवैध ठरवल्याने त्या विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशाची संधी गेली तसेच महाराष्ट्रातील प्रवेशही रद्द झाले. ऑल इंडिया व डीएनबीमधील प्रवेशाच्या फेरीतील प्रवेश नाकारल्याने तसेच ऑल इंडिया व डीएनबीमधील प्रवेश फेर्‍याही बंद होत आल्या आहेत. प्रवेशाचे सर्व मार्ग बंद झाले असताना आरक्षणातून मिळालेला प्रवेशही अवैध ठरवल्याने विद्यार्थी हताश झाले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून झालेल्या फसवणुकीमुळे आमची अवस्था ‘तेलही गेले अन् तूपही गेले’ अशी झाली आहे. त्यामुळे सरकारने आरक्षणाऐवजी आमचे प्रवेश निश्चित करावे, यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो असल्याची माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली.

वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने तब्बल 250 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशामध्ये आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे सरकारकडून झालेला अन्यायाविरोधात व प्रवेश निश्चितीसाठी आहे. आंदोलनाला बसलेल्या 250 विद्यार्थ्यांपैकी 70 विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातून देशाच्या विविध ठिकाणी त्यांना हव्या असलेल्या बॅचला प्रवेश मिळत होता. पंढरपूर येथील विजय प्रकाश यादव या विद्यार्थ्याला कोल्हापूरच्या गव्हरमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश डिप्लोमॅट इन नॅशनल बोर्ड (डीएनबी) अंतर्गत 1 लाख 25 हजार रुपये भरून प्रवेश मिळत होता. परंतु त्याने पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होता व त्याला मराठा आरक्षणातून बी.जे. मेडिकल कॉलेजमध्येच एक लाख रुपये शुल्क भरून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. त्यामुळे त्याने कोल्हापूरचा प्रवेश नाकारून बी.जी. मेडिकलमध्ये रुजू झाला. पण हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचा प्रवेश रद्द करण्यात आला. तसेच डीएनबी व ऑला इंडियाची प्रवेश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आल्याने त्याला पुन्हा प्रवेश घेण्याची संधीही नाही. त्यातच ऑल इंडिया कोटा व डीएनबीमध्ये एकदा प्रवेश नाकारल्यास विद्यार्थ्याला त्या कोट्यासाठी पुढील तीन वर्षे अर्ज करता येत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील प्रवेश रद्द झाला तर दुसरीकडे ऑल इंडिया कोटा व डीएनबीतून प्रवेशाचा मार्गही बंद झाला आहे. विजय प्रमाणे गौरव पवार या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून पंजाबमधील अंबाला येथे प्रवेश मिळाला होता. मात्र आरक्षणामुळे महाराष्ट्रात प्रवेश मिळत असल्याने त्यानेही प्रवेश नाकारला. त्याचप्रमाणे अंजली देशमुख या विद्यार्थींनीलाही डीएनबीमधून मेडिसिनसाठी प्रवेश मिळत होता.

- Advertisement -

परंतु मराठा आरक्षणातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजीला प्रवेश मिळाल्याने तिने डीएनबीतून प्रवेश घेतला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणातून महाराष्ट्रातच प्रवेश मिळत असल्याने ऑल इंडिया कोट्याकडे पाठ फिरवली. परंतु मराठा आरक्षणामुळे प्रवेशच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशशुल्क भरणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी असा कोणताही प्रस्ताव त्यांनी आम्हाला दिलेला नाही. एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे शुल्क हे जवळपास कोटीच्या घरात आहे. सरकारला राज्यातील दुष्काळग्रस्तांना व शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी पैसा नसताना ते आमचे शुल्क भरण्याचा आव कशाला आणत आहेत असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. सरकारने आरक्षणाच्या माध्यमातून आमची फसवणूक केली आहे. त्यांनी आमचे शुल्क भरण्याऐवजी व आम्हाला आरक्षण देण्याऐवजी आमचे प्रवेश निश्चित करावे यासाठीच आमचे हे आंदोलन असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. याविषयावर कायदेशीर प्रक्रिया सुरु केली असून या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. लवकरच त्यावर ठोस तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री व मराठा आरक्षण अंमलबजावणी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. विद्यार्थी, पालक व मराठा समाजातील नेत्यांची बैठक बुधवारी महसूल मंत्री पाटील यांच्याकडे झाली. नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी 25 मे अंतिम तारीख असून ही तारीख 31 मे पर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे केला आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा दहा दिवसांपासून सुटत नसल्याने त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तो सोडवण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -