घरमुंबईमराठा आरक्षण दुर्दैव  

मराठा आरक्षण दुर्दैव  

Subscribe

दत्तात्रय अंगद वाघमारे हे तरुण चालक कंटेनर घेऊन पुणे-कळंबोली अशा फेर्‍या करायचे. त्यातून मिळणार्‍या तुटपुंज्या मिळकतीवर पत्नी, मुलगा, मुलगी असे कुटुंब चालवायचे. बुधवारी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दिवशीही ते कंटेनर घेऊन कळंबोलीत आले. पण आंदोलन भडकले होते. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी..

दत्तात्रय अंगद वाघमारे हे तरुण चालक कंटेनर घेऊन पुणे-कळंबोली अशा फेर्‍या करायचे. त्यातून मिळणार्‍या तुटपुंज्या मिळकतीवर पत्नी, मुलगा, मुलगी असे कुटुंब चालवायचे. बुधवारी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दिवशीही ते कंटेनर घेऊन कळंबोलीत आले. पण आंदोलन भडकले होते. रास्ता-रोको झाला म्हणून कंटेनर बाजूला लावून क्लिनरसोबत दत्तात्रय रस्त्याच्या बाजूला उभे होते. पोलिसांनी नळकांड्या फोडल्यावर परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून ते कंटेनर तेथेच सोडून पळू लागले. इतक्यात गोळीबार झाला. त्यातील एक गोळी आंदोलनात सहभागी नसलेल्या दत्तात्रय यांच्या कमरेत शिरली आणि दत्तात्रय कायमचे आपल्या रोजगाराला मुकले. मराठा आंदोलन बुधवारी ऐन जोमात असताना पनवेलमधील कळंबोली येथे मोठ्या प्रमाणात समाजाचे नागरिक रस्त्यावर उतरले. मराठा समाजाच्या आंदोलकांनी दुपारी 11 वाजल्यानंतर रस्त्यावर उतरून गाड्या थांबवण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी पुण्याहून मुंबईला गाड्यांचा कंटेनर घेऊन येत असलेल्या दत्तात्रय अंगद वाघमारे (वय 33) या मराठा तरुणाचा कंटेनर आंदोलकांनी अडवला. आंदोलक आक्रमक असल्याने दत्तात्रय व क्लिनर दोघांनी कंटेनर थांबवला व ते गाडीत बसून राहिले. 11 वाजल्यापासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत जवळपास साडेतीन तास ते दोघे कंटेनरच्या केबिनमध्येच बसून होते. पण 2.30 च्या सुमारास आंदोलकांनी दगडफेकीस सुरुवात केली. त्यामुळे एखादा दगड कंटेनर केबिनच्या काचेवर फेकल्यास आपल्याला इजा होऊ नये यासाठी दत्तात्रय त्याच्या साथीदारासोबत गाडीतून खाली उतरून रस्त्याच्या बाजूला जाऊन उभे राहिले.

- Advertisement -

दुपारी 3.30 च्या दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी धुराच्या नळकांड्या फोडत गोळीबार केला. त्यामुळे हे दोघेही तेथून आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. यातच पोलिसांनी फायर केलेली एक गोळी दत्तात्रय यांच्या कमरेमध्ये घुसली व दत्तात्रय जागेवरच कोसळले. दत्तात्रयला गोळी लागल्याचे पाहून क्लिनरने आरडाओरडा केला. क्लिनरला आरडाओरडा करताना पाहुन पोलिसांनी पुढे येत त्यांना अ‍ॅम्ब्युलन्समधून कळंबोली नाक्यावर असलेल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दत्तात्रय यांच्या कमरेमध्ये गोळी लागल्याने मणक्यातून जाणार्‍या रक्तवाहिन्यांना, अन्ननलिकेला व आतड्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. एमजीएम हॉस्पिटलमधील डॉक्टर समीर कदम व डॉ. गेडाम यांनी दत्तात्रय यांच्यावर तातडीने उपचार करत त्यांच्या शरीरातील बंदुकीच्या गोळीचे 14 छर्रे काढत त्यांचा जीव वाचवला. परंतु डाव्या पायाची नस व मणक्याला इजा झाल्याने दत्तात्रय यापुढे गाडी चालवू शकणार नव्हते. तसेच ते ओझे उचलण्यासारखी जड कामेही करू शकणार नव्हते, अशी माहिती दत्तात्रयचे चुलते भूमिपूत्र वाघ यांनी दिली.

डॉक्टरांनी दत्तात्रय यांच्यावर तातडीने उपचार करत त्यांचा जीव वाचवला असला तरी अजून पाच ते सहा दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दत्तात्रय यांच्या मणक्याला इजा झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या छातीचा व पोटाचा सीटी स्कॅन करण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय यांचे आते भाऊ सुहास चव्हाण यांनी दिली.

कंटेनर चालवू शकणार नाही

दत्तात्रय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सातेफळ या गावचे तरुण आहेत. तो कामानिमित्त पुण्यातील चिखली येथे आपली पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह स्थायिक झाले आहेत. ते दररोज पुण्याहून मुंबईतील गोदीमध्ये चार चाकी गाड्या कंटेनरमधून घेऊन येतात. बुधवारीही पहाटे ते कंटेनर घेऊन मुंबईत आले होते. या कामातून दत्तात्रय यांना महिना 20 ते 25 हजार वेतन मिळते. दत्तात्रय हे घरातील एकटेच कमवते आहेत. त्यांचे आईवडील सातेफळ गावात शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. दत्तात्रय यापुढे गाडी चालवू शकणार नाहीत आणि ते अवजड कामेही करू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांच्या कुटुंबावर कुर्‍हाड कोसळली आहे. मणक्याला इजा झाल्याने दत्तात्रय गाडी चालवू शकणार नाहीत. तसेच शेतीची कामेही करू शकणार नाहीत. त्यामुळे आता घर कसे चालणार असा बिकट प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.

दत्तात्रयला सरकारने रोजगार द्यावा

कोणतीही चूक नसताना मराठा आंदोलनामध्ये दत्तात्रयला गोळी लागून तो जखमी झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे सरकारने दत्तात्रयच्या औषधोपचाराचा खर्च उचलत त्याच्या रोजगारासाठी प्रयत्न करून त्याला नोकरी द्यावी अशी मागणी दत्तात्रयचे काका भूमिपूत्र वाघ यांनी केली.

हॉस्पिटलमधील डॉक्टरही उपचारासाठी

उस्मानाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मल्हार पाटील यांनी बुधवारी तातडीने एमजीएम हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तसेच तेरणा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनाही एमजीएममधील डॉक्टरांच्या मदतीला आणले. त्याचप्रमाणे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी गुरुवारी येऊन दत्तात्रयची भेट घेतली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -