घरमुंबईशिवसेनेत ‘मराठा विरूद्ध आगरी’ गटबाजी उफाळणार

शिवसेनेत ‘मराठा विरूद्ध आगरी’ गटबाजी उफाळणार

Subscribe

कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत वरिष्ठ नगरसेविकेकडून अर्वाच्च भाषेत जातीवाचक अपशब्द वापरून अवमान केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या नगरसेविका मनिषा तारे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेनेतील मराठा विरुद्ध आगरी अशी गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे वादावर पांघरुण घालण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाèयांनी राजीनामा पत्र मिळाले नसल्याची सारवासारव केली आहे. मात्र नगरसेविका तारे यांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्त अथवा पालिका सचिवांकडे सादर न करता महापौर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यामुळे ही दबावतंत्राची खेळी असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

- Advertisement -

कल्याण डोंबिवलीतील कोणतीही निवडणूक असो ती आगरी समुदायाभोवतीच फिरत राहिली. प्रत्येक पक्षातही आगरी समाजाची व्यक्ती प्रमुख पदावर विराजमान झाली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रमुख पदावर आगरी समाजाची व्यक्ती असावी, असा प्रयत्न नेहमीच दिसून आला. नगरसेवकपदाची निवडणूक असो वा विधानसभा, लोकसभेची. आगरी समाजाला प्राधान्य मिळावे, यासाठी प्रत्येक पक्षातून फिल्डींग लावली जाते. यंदाच्या महापौर पदाच्या निवडणुकीतही हे दिसून आले.

महापौरपद आगरी समाजाला मिळावे, अशी जोरदार मागणी शिवसेना भाजपातील आगरी समाजातील काही नगरसेवकांनी उचलून धरली होती. मात्र काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या पत्नी विनिता राणे यांना महापौरपद मिळाल्याने शिवसेना आणि भाजपमधील आगरी समाजातील काही नगरसेवकांनी जाहिरपणे नाराजी प्रकट केली होती. त्याचे पडसाद महापौर व उपमहापौर निवडणुकीत उमटले होते. त्यामुळे शिवसेनेतील जातीपातीवरून गटबाजी समोर आली होती.

- Advertisement -

काय घडलं त्या दिवशीच्या सभेत…
महापौर व उपमहापौरपदाची १० मे रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे व उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर या बिनविरोध निवडून आल्या. याच सभेत शिवसेनेच्या काही नगरसेविकांनी आगरी समाजाला महापौरपद न मिळाल्याने अन्याय झाल्याची नाराजी व्यक्त करीत टीका केली होती. त्यावरून नगरसेविका मनिषा तारे आणि वैजयंती घोलप यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी घोलप प्रचंड संतापल्या. शिवसेनेत जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही. आपले शब्द मागे घ्या, असा आग्रह धरला. ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मध्यस्थी करीत त्यांना शांत केले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेत जातीपातीला व गटबाजीला थारा नाही. यंदाचे महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित होते. त्यानुसार राणे यांना महापौरपद दिले आहे, असे सांगत त्यांनी पक्षाच्या या निर्णयाचे समर्थन केले होते. पण तारे यांच्या राजीनामापत्रामुळे पक्षातील धुसफूस अजूनही शमली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरसेविका मनिषा तारे यांचा राजीनामा प्रत्यक्षात माझ्याकडे आलेला नाही. मी कामात असल्याने कालचे टपाल पाहता आलेले नाही. कालच्या टपालात असेल तर पाहून सांगते.

विनीता राणे, महापौर

 


संतोष गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -