घरताज्या घडामोडीमराठी भाषा दिनाचा रेल्वेत थाट तर एसटीत वाट

मराठी भाषा दिनाचा रेल्वेत थाट तर एसटीत वाट

Subscribe

यंदाचा मराठी भाषा दिन थाटात साजरा करण्याचे आदेश स्वत: परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. मात्र, असे असताना देखील बहुतांश एसटी स्थानकावर मराठी गीत वाजले नसल्याचे समोर आले आहे.

माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात मोठ्या थाटामाटत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत होता. मात्र, यंदाचा मराठी भाषा दिन थाटात साजरा करण्याचे आदेश स्वत: परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. मात्र, असे असताना देखील बहुतांश एसटी स्थानकावर मराठी गीत वाजले नसल्याचे समोर आले आहे. परंतु, त्यामागचे कारण सुध्दा न पटणारे आहे. राज्यात अनेक बसस्थानकांच्या उद्घोषणा यंत्रामध्ये बिघाड असल्यामुळे हे गाणे वाजले नाही. इतकेच नव्हे, तर अनेक बसस्थानक परिसर अस्वच्छ दिसून आले. त्यामुळे सर्वस्तरातून एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याउलट मध्य रेल्वेच्या आणि पश्चिम रेल्वेच्या बहुतेक स्थानकांवर रांगोळीचा सडा टाकता प्रवाशांनी मराठी भाषा दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात मराठी भाषा दिन साजरा केला. त्यामुळे मराठी भाषा दिनाचा रेल्वेत थाट तर एसटीत वाट लागल्याचे दिसून आले.

एसटी स्थानकावर मराठी गाणे वाजलेच नाही

एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकांवर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा, असे आदेश स्वत: परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिले होते. मात्र, हे आदेश देत असताना, त्यांनी सांगितले की मराठी भाषा गौरव दिन कसा साजरा करावा? सर्वच बसस्थानकाच्या ध्वनिक्षेपकावरून दिवसभर सातत्याने एसटी महामंडळाच्या सर्व प्रवासी आणि कर्मचारी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात याव्यात. बसस्थानकांच्या उद्घोषणा यंत्राद्वारे कवी सुरेश भट यांनी लिहिलेले आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले ‘लाभले आम्हास भाग्य…’ हे मराठी अभिमान गीत प्रवाशांना दिवसभर ऐकविण्याचे आदेश दिले होते. मात्र, २७ फेब्रुवारीला राज्यात अनेक आगारामध्ये एसटी मराठी गाणे वाजू शकली नाही. प्रवाशांना फक्त जाहिराती ऐकू येत होती. मात्र, मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या आदेशाचे पालन एसटीच्या अनेक आगारात पाळले गेले नाही. परिणामी प्रवाशांनी एसटीचा कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नियोजनाचा अभाव

एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकावर मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा, असे आदेश तर दिले होते. मात्र, बहुतांश एसटी आगारात नियोजनाचा अभाव दिसून आला. प्रवाशांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्याकरिता आणि मराठी गाणे वाजण्याकरता असलेल्या उद्घोषणा यंत्रामध्ये बिघाड दिसून आला. त्यामुळे अनेक आगार प्रमुखानाचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले आहे.

रावतेची आली आठवण

माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळात त्यांच्या कार्यकाळात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या थाटात साजरा केला होता. इतकेच नव्हेतर एसटी महामंडळाचे सर्व कामकाज हे मराठी भाषेत करण्याच्या लेखी सूचना देण्यात यायच्या. या सुचनेच पालन करण्यार्‍या एसटी महामंडळातील विविध शाखेच्या अधिकार्‍यांवर रावतेंच्या कार्यकाळात एसटी महामंडळाच्या मराठी भाषा दक्षता अधिकर्‍यांनी कारवाई केली होती. मात्र, आताचे परिवहन मंत्री परब यांच्या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे अनेक कर्मचार्‍यांना रावतेची आठवण आली आहे.

- Advertisement -

रेल्वे स्थांनकावर रांगोळीचा सडा

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मराठी भाषा दिनानिमित्ताने राजकीय कलगीतुरा पहायला मिळाला. येथे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने प्रवाशांना मराठी दिनाच्या शुभेच्छा देणारी भव्य अशी रांगोळी रेखाटली होती. त्यानंतर विलंब झालेल्या शिवसेनाप्रणीत रेल्वे कामगार सेनेनेही रांगोळीचा खडा टाकण्यास सुरुवात केली. गोरेगाव स्थानकावर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी रेखाटलेल्या रांगोळीने सर्व प्रवाशांचे लक्ष वेधले. या आकर्षक रांगोळीचे फोटो घेण्यासाठी प्रवाशांनी स्थानकावरच गर्दी केली होती.

फ्लँशमॉबमधून दिल्या शुभेच्छा

सीएसएमटी स्थानकावर मराठी भाषा दिनानिमित्त १५ ते २० तरुण-तरुणींनी मान मराठी मनाचा या उपक्रमाद्वारे मराठमोळ्या गाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी फ्लॅश मॉब सादर करण्यात आला. यावेळी सहभागी तरुणांनाचे नृत्य पाहण्यासाठी सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. सीएसएमटी स्थानकात या तरुण-तरुणींनी फ्लॅशमॉब करत उपस्थित प्रवाशांचेलक्ष वेधून घेतले. या तरुणाईने आपल्या फ्लॅशमॉबमधून रेल्वेचे युटीएस अँपबाबत जनजागृती केली. प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.

खर्‍या अर्थाने मराठीकरण करा

बस स्थानकावरील प्रवाशांना एसटी कर्मचार्‍यांनी पेढे वाटून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील नोंदणी पुस्तकावर बहुतांश अभ्यासकांनी आपला परिचय इंग्रजी भाषेतच लिहिला होता. याशिवाय शिवशाही सारख्या गाड्यांवर आपत्कालीन मार्ग ऐवजी इंग्रजी शब्द दिसून आले. त्यामुळे लालपरीत वरवरचा मराठी भाषा दिन साजरा करण्याऐवजी खर्‍या अर्थाने मराठीकरण करण्याची मागणी प्रवासी मंगेश राकडे यांनी केली आहे.


हेही वाचा – श्वेता महालेंची साडी; अन महिला आमदारांमध्ये चर्चा


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -