घरमुंबईमातृत्वासाठी केले मुलीचे अपहरण

मातृत्वासाठी केले मुलीचे अपहरण

Subscribe

मातृत्वसुख हे जगातील सर्वात मोठं सुख असे म्हटले जाते. पण ते मिळविण्यासाठी एखादी स्त्री असेही करू शकेल यावर विश्वास बसत नाही. पण अशी घटना घडली आहे. सीएसएमटी स्थानकात असणार्‍या गर्दीचा फायदा घेऊन २ वर्षांच्या लहान मुलाला चोरणार्‍या एका महिलेला लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये अटक करुन मुलाची सुटका केलेली आहे. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी सीएसएमटी स्थानकावरून आपला पती आणि २ वर्षांच्या मुलासह गावी जाणार्‍या विमल सातदिवे स्थानकात झोपल्या असताना त्यांच्या दोन वर्षांचा मुलाला एका महीलेने पळवून नेले होते. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपी महिलेला नालासोपारानजीक असणार्‍या तुळींज परीसरातून अटक केली. पार्वतीदेवी रामछबीला विश्वकर्मा असे या आरोपी महिलेचे नाव असून अवघ्या २४ तासात २ वर्षांच्या लहान बाळाची सुटका करण्यात लोहमार्ग पोलीस यशस्वी झाले आहेत.

आरोपी महिला पार्वती विश्वकर्मा ही चार तारखेला रात्रीच्या सुमारास मुलाला पळवण्याच्या उद्देशानेच सीएसएमटी स्थानकात आली होती. सीएसएमटी हे गर्दीचे स्थानक असल्यामुळे मुलाला चोरण्यात यशस्वी होऊ असा तिचा गैरसमज होता. त्यानुसार आपल्या पतीची वाट पाहता पाहता मुलासह झोपी गेलेल्या विमल सातपुते (मुलाची आई) यांच्यावर तिची नजर पडली आणि रात्री बाराच्या सुमारास तिने २ वर्षांच्या सनीला घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर जाग येताच भेदरलेल्या मुलाच्या आईने सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता सीसीटीव्हीमध्ये एक महिला सनीला घेऊन अंधेरीकडे जाणार्‍या लोकलमध्ये चढताना दिसली. लोहमार्ग पोलिसांनी प्रत्येक स्थानकातले सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यावर सदर महिला नालासोपारा स्थानकातून मुलाला घेऊन पूर्वेकडच्या बाजूला जाताना दिसली होती. त्यानुसार तिथल्या रिक्षावाल्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना या महिलेला शोधून काढण्यात यश मिळाले आणि त्यानंतर त्यांनी २ वर्षाच्या मुलाचीही सुखरूप सुटका केली.

- Advertisement -

रिक्षावाल्याची पोलिसांच्या तपासाला मदत

नालासोपारा स्थानकातून पूर्वेकडच्या बाजून बाहेर पडताना आरोपी महिला दिसत होती. पोलिसांनी पूर्वेकडे असणार्‍या सर्व रिक्षावाल्यांकडे चौकशी केली तेव्हा एका रिक्षावाल्याने सदर महिलेला मुलासह नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोड परिसरात सोडले असल्याचे सांगितले. मनोज श्रीवास्तव असे या रीक्षाचालकाचे नाव असून त्याने पोलिसांच्या पथकाला त्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम केले. पोलिसांनी त्या परिसरात महिलेचे फोटो दाखवले असता आरोपी महिलेचा शोध लागला.

२० वर्षे अपत्य नसल्याने चोरले
या प्रकरणातील आरोपी महिला पार्वती विश्वकर्मा हिच्या लग्नाला वीस वर्षे झाली होती पण त्यांना अपत्य नव्हते. अपत्य नसल्यामुळे ती अस्वस्थ होती.आपल्या घरात लहान मलू असायलाच हवे म्हणून तिने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

- Advertisement -

सदर प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिलेल्या आदेशानुसार सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आणि पोलीस पथकाने केला असून ऐन दिवाळीत ताटातूट झालेल्या आई आणि मुलाला एकत्र आणल्यामुळे त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -