घरमुंबईशेवटच्या सभेत महापौरांनी मंजूर केले १५० प्रस्तावांना मंजुरी

शेवटच्या सभेत महापौरांनी मंजूर केले १५० प्रस्तावांना मंजुरी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या नवीन महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होत असून विद्यमान महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी बुधवारी झालेल्या शेवटच्या महापालिका सभेत सर्वच प्रस्ताव मंजुर केले.

मुंबई महापालिकेच्या नवीन महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होत असून विद्यमान महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी बुधवारी झालेल्या शेवटच्या महापालिका सभेत सर्वच प्रस्ताव मंजुर केले. महापौरांनी या शेवटच्या सभेत तब्बल १५० प्रस्ताव मंजूर करत प्रलंबित कामांचा निपटारा केला. मुंबईचे विद्यमान महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कालावधी २२ नोव्हेंबरपर्यंत असून तत्पूर्वी त्यांनी बुधवारी महापालिकेची सभा बोलावत सर्व प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देत कामे उरकून घेतली. बुधवारी महापौरांनी, कुणालाही निवेदन तसेच हरकतीचा मुद्यांसह प्रस्तावांवर बोलू न देता, सर्व प्रस्ताव विनाचर्चा मंजूर केले. यामध्ये देवनार क्षेपणभूमीच्या कामांसंदर्भात अंबरनाथ येथे ८ अतिक्रमणधारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावाबरोबरच गारगाई प्रकल्पासाठी सहायक सल्लागारांची नेमणूक करणे तसेच त्यासाठी खासगी जमिन खरेदी करणे, वर्सोवा आणि घाटकोपर मलजल प्रक्रीया केंद्रासाठी सल्लागारांची नेमणूक करणे. मोगरा आणि माहुल पर्जन्य जलवाहिनी केंद्रांच्या बांधकामांसाठी सल्लागारांची नेमणूक करणे आदींचा समावेश आहे.

याशिवाय वादग्रस्त भाभा रुग्णालय तसेच शीव रुग्णालयाच्या परिसरात बांधण्यात येणार्‍या इमारतींचा प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये नायर रुग्णालयाच्या दुरुस्तीचाही समावेश आहे. स्वच्छ भारत अभियांनांतर्गत एम/पूर्व विभागात शौचालयांची उभारणी करणे, राणीबाग येथे मेंब्रेन बायोरिऍक्टर तंत्रज्ञानावर आधारीत ५०० किलोलिटर प्रतिदिन इतक्या क्षमतेच्या भूमिगत मलजल प्रक्रीया केंद्राची उभारणी आदी प्रस्तावांचाही यात समावेश आहे. याबरेाबरच बेस्टला आर्थिक मदत देण्याचाही प्रस्ताव मंजुर झाला. परंतु कोणत्याही विषयावर विरोधी पक्ष किंवा पहारेकरी यांनी एक चकार शब्दही काढला नाही. महापौरांची शेवटची सभा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वांनीच त्यांना सहकार्य केल्यामुळे अखेर महापौरांनीही आपल्या अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण सहकार्य करणार्‍या सर्व सदस्यांचे आभार मानले. महापौरांनी बुधवारी कार्यक्रम पत्रिकेवरील काही प्रलंबित प्रस्तावांबरोबरच तातडीचे कामकाजाचे १५० प्रस्ताव मंजुर केले.

- Advertisement -

शेवटची सभाही उशिराच

प्रिन्सिपॉल असलेल्या विश्वनाथ महाडेश्वर हे सभागृहाचे कामकाज अगदी वेळेत चालवतील आणि सर्वांवर शिस्तीची छडी उगारतील, असे बोलले जात होते. परंतु महापौरांनी मुदतवाढीसह पावणे तीन वर्षांच्य कालावधीत एकदाही वेळेत सभागृह चालवले नाही. दुपारी अडीच वाजताचे सभागृह हे पावणे चार ते चार आणि त्यापुढेच भरले गेले. खुद्द महापौरच उशिरा येत असल्याने उशिराने भरणार्‍या या सभागृहातील कामकाजात नगरसेवकांनाही फारसे स्वारस्य राहत नव्हते. त्यामुळे सभागृहात हजेरी नोंदवून नगरसेवक घरचा रस्ता धरत असत. परंतु ही प्रथा महापौरांच्या शेवटच्या सभेपर्यंत चालू राहिली. त्यामुळे महापौरांच्या या कालावधीत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या आणि पहारेकरी असलेल्या भाजपच्या एकाही नगरसेवकाला सभागृहात चमक दाखवता आली नव्हती. किमान नवीन महापौरांनी वेळेचे भान राखून निश्चित केलेल्या वेळेवर सभागृहाचे कामकाजाला सुरुवात करत सर्वच नगरसेवकांना बोलू द्यावे, हीच नगरसेवकांची मागणी आहे.

हेही वाचा –

पेढ्यांची ऑर्डर गेली असं समजा – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -