घरCORONA UPDATECoronaEffect: मेडिकल दुकानात लवकरच औषधांचा तुटवडा

CoronaEffect: मेडिकल दुकानात लवकरच औषधांचा तुटवडा

Subscribe

मनुष्यबळाअभावी कमी झालेली औषध निर्मिती आणि वितरकांकडून कमी येत असलेली औषधे यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील मेडिकल स्टोअरमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना औषधे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी मेडिकल स्टोअर २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु मनुष्यबळाअभावी कमी झालेली औषध निर्मिती आणि वितरकांकडून कमी येत असलेली औषधे यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील मेडिकल स्टोअरमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वितरकांकडून औषधेच येत नसल्याने मेडिकल स्टोरचे मालक चिंतेत पडले आहेत. सध्या काही दिवस पुरतील इतकीच औषधे असल्याने मेडिकल स्टोअर मालकांकडून कायमस्वरूपी औषध नेणाऱ्या ग्राहकांना महिन्याची औषधे आताच नेण्याचा सल्लाही देण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्याचा फटका औषध निर्मिती आणि वितरणावर होत आहे. परिणामी पुढील दहा दिवसांमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये औषधे मिळणे कठिण होईल.
– अभय पांड्ये, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर्स फेडरेशन

- Advertisement -

वितरकांकडून औषधांच्या पुरवठ्यात घट

कोरोनाला रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी वगळता अन्य सर्व नागरिकांना घरात थांबावे लागत आहे. संचारबंदी काळात नागरिकांना औषधे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी मेडिकल स्टोअरचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. परंतु लोकडाऊनमुळे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने औषध निर्मिती कंपन्या आणि वितरकांकडून औषधांचा पुरवठ्यात घट झाल्याचे दिसून येत आहे.
गुजरात, हरयाणा आणि उत्तरांचल या तीन राज्यांमध्ये देशातील ८० टक्के औषधांची निर्मिती होते. परंतु लॉकडाऊनमुळे औषध कंपन्यांना कच्चा मालाबरोबरच मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे औषध निर्मितीमध्ये प्रचंड घट झाली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे वितरकांकडेही मनुष्यबळ नसल्याने ते मेडिकल स्टोअर मालकांना गोडाऊनमध्ये येऊन औषधे घेऊन जाण्यास सांगत आहेत. परंतु मेडिकल स्टोअर मालकांकडेही अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांना जाणे शक्य होत नाही. याचा परिणाम संपूर्ण औषध मार्केटमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा – LockDown: परदेशातील १० लोकं नेवासा मशिदीत लपून; अखेर पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ नसल्याने वितरकांना औषध पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही त्यांना मनुष्यबळ पुरवणार आहोत, त्यामुळे दोन दिवसांत मुंबईतील औषध पुरवठा सुरळीत होईल.
– जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट

औषध निर्मितीत झालेली घट आणि सेवा पुरवण्यात वितरकांना येणाऱ्या अडचणी यामुळे मेडीकल स्टोअरमधील औषधांची संख्याही कमी झाली आहे. परंतु सध्या उपलब्ध असलेला औषध साठा आणि वितरकांकडून काही प्रमाणात होत असलेला पुरवठा यामुळे नागरिकांना औषधे देण्यात येत असल्याचे मेडिकल स्टोअर मालकांकडून सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवस औषधांचा पुरवठा न आल्यास आम्हाला दुकाने बंद ठेवावी लागतील, असेही मेडिकल स्टोअर मालकांकडून सांगण्यात आले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -