घरमुंबईमुंबई महापालिकेची नवीन वर्षात भेट, १३९ वैद्यकीय चाचण्या १०० रुपयात

मुंबई महापालिकेची नवीन वर्षात भेट, १३९ वैद्यकीय चाचण्या १०० रुपयात

Subscribe

विविध आजारांच्या निदानासाठी करण्यात येणार्‍या वैद्यकीय चाचण्या आता महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये अवघ्या शंभर आणि दोनशे रुपये इतक्या माफक दरात होणार आहेत. ‘आपली चिकित्सा’ योजनेअंतर्गत 139 प्रकारच्या मूलभूत आणि जटिल वैद्यकीय चाचण्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. त्यानंतर त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन वर्षांत मुंबईकरांना या सुविधेचा लाभ घेता येईल, अशी दाट शक्यता आहे. महापालिकेच्या हॉस्पिटल्ससह दवाखाने आणि प्रसूतिगृहांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. याकरता शहर आणि उपनगरांसाठी थायरोकेअर आणि मेट्रोपॉलिस या नामांकित प्रयोगशाळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे रक्तासह विविध प्रकारच्या अन्य वैद्यकीय चाचण्यांसाठी गरीब रुग्णांच्या खिशावर येणारा ताण कमी होणार आहेे.

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या आजारांचे निदान व्हावे यासाठी करण्यात येणार्‍या वैद्यकीय चाचण्या ‘आपली चिकित्सा’ योजनेंतर्गत माफक दरात करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली होती. अर्थसंकल्पीय भाषणात याची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्षात ही योजना आकाराला येत आहे. पुढील चार वर्षांकरता या योजनेंतर्गत 19 विशेष व उपनगरीय हॉस्पिटल्स, 175 दवाखाने आणि 28 प्रसूतिगृहांमध्ये वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड व मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेड या नामांंकित प्रयोगशाळांची निवड केली आहे. यामध्ये 101 प्रकारच्या मूलभूत नमूना चाचण्या आणि 38 प्रकारच्या अतिविशेष प्रगत नमूना चाचण्या करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक चाचणीसाठी अनुक्रमे शंभर व दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.

- Advertisement -

महापालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि नायर दंत या चार प्रमुख हॉस्पिटल्समध्ये २४ तास मूलभूत आणि प्रगत तथा जटिल चाचण्यांची चिकित्सा करण्याची सुविधा आहे. मात्र १६ उपनगरीय हॉस्पिटल्सपैकी राजावाडी, कांदिवली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, वांद्रे येथील के.बी. भाभा, गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटल या चार हॉस्पिटल्समध्येही दिवस-रात्र ही प्रयोगशाळा सुरू आहे. याठिकाणी मूलभूत तपासण्या होतात, पण जटिल तपासण्या होत नाहीत. तर उर्वरित १२ हॉस्पिटल्समध्ये एक किंवा दोन पाळ्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू आहे. पण तिथेही जटिल तपासण्या होत नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

‘आपली चिकित्सा’ या योजनेअंतर्गत महापालिका रुग्णांकडून मूलभूत नमुना चाचणीसाठी प्रति चाचणी १०० रुपये शुल्क आकारणार आहे, परंतु प्रयोगशाळेला त्याच चाचणीसाठी २२३ रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहेत. तर मूलभूत चाचणीसाठी ८९२ रुपये द्यावे लागणार आहेत. त्यातुलनेत रुग्णांकडून मूलभूत चाचणीसाठी २०० रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

- Advertisement -

वैद्यकीय चाचणी नि:शुल्क करण्यास नकार
महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये ‘आपली चिकित्सा’ योजनेअंतर्गत होणार्‍या वैद्यकीय चाचण्या नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय प्रशासनाने बदलून यासाठी शंभर आणि दोनशे रुपये शुल्क आकारण्याचे निश्चित केले. तसेच एकूण 140 प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार होत्या. त्यातील एक चाचणी कमी करून 139 चाचण्याच निश्चित केल्या आहेत.

मूलभूत नमुना चाचण्या            १०१
प्रति चाचणी शुल्क                १०० रुपये
अतिविशेष नमुना चाचण्या         ३८
प्रति चाचणी शुल्क               २०० रुपये

शहर
प्रयोगशाळा : थायरोकेअर
टेक्नॉलॉजी लिमिटेड
चार वर्षांचे कंत्राट                 २३.१८
विशेष रुग्णालये                    ०५
दवाखाने                            ७०
प्रसूतिगृहे                           ०५

पूर्व उपनगर
प्रयोगशाळा : मेट्रोपॉलिस
हेल्थकेअर लिमिटेड
चार वर्षांचे कंत्राट                 २६.८६
उपनगरीय रुग्णालये               ०८
दवाखाने                            ४७
प्रसूतिगृहे                            १०

पश्चिम उपनगर
प्रयोगशाळा : थायरोकेअर
टेक्नॉलॉजी लिमिटेड
चार वर्षांचे कंत्राट                 २९.१४
उपनगरीय रुग्णालये                ०८
दवाखाने                             ५८
प्रसूतिगृहे                             १३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -