घरमुंबईम्हणून राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला

म्हणून राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला

Subscribe

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत राहणार की राज्यात नवीन समीकरण तयार होणार हे पाहाव लागणार आहे.

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता वेध लागले आहेत ते आगामी विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष लागले आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. बंद दरवाजा आड राज ठाकरे आणि राजू शेट्टी या दोन्ही नेत्यांमध्ये एक तासांहून अधिक वेळ चर्चा झाली आहे. यावेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत राहणार की राज्यात नवीन समीकरण तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेला अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेत फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सोबतीला जाऊन बसलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना ४९ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक झाली त्यात हा ठराव करण्यात आला आहे.

- Advertisement -

विधानसभेत मनसेची भूमिका काय असणार?

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरताही प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि भाजपच्या जाहीरातबाजीचे व्हिडिओ सभांमधून दाखवले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे शब्द राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरावी, एवढी दहशत या शब्दांनी निर्माण केली. लोकांनीही राज ठाकरेंच्या या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज ठाकरेंच्या भाषणाचा परिणाम जाणवला नसला तरी विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल हे पाहावे लागणार आहे.

निवडणुकीआधी विरोधकांची मोट बाधण्याचा राजू शेट्टीचा प्रयत्न –

दरम्यान येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका असून, जर भाजपा-शिवसेनेला सत्तेतून घालवायचे असेल तर समविचारी पक्षानी एकत्र येण्याची गरज असून, या सर्व समविचारी पक्षाची मोट राजू शेट्टी बांधत असून, राज ठाकरेंनी यामध्ये पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी आजच्या भेटीत केल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – आता अर्थमंत्र्यांचे विरोधकांना झिंगाट उत्तर; राज ठाकरेंवरही साधला निशाणा!

हेही वाचा – अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -