घरमुंबईरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

Subscribe

रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रविवारी मुंबईकरांचे मेगा हाल होणार असल्याचे चिन्ह आहे. मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेच्या रात्रकालीन ब्लॉक हा वसई रोड ते भायंदर रेल्वे स्थानकादरम्यान असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिन्ही मार्गावरील धावणार्‍या लोकल सेवांचे वेळापत्रक पाहून बाहेर पडावे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ३.५० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान माटुंगा स्थानकावरून डाऊन धीम्या मार्गावरील सुटणार्‍या सर्व लोकल माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन जल्द मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तर या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड रेल्वे स्थानकावर थांबतील. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी ११.४०  ते सायंकाळी ४.१०  वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वडाळा रोड रेल्वे स्थानकातून सुटणार्‍या वाशी, बेलापूर, पनवेल सर्व डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेने रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक हा रात्री घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल होणार नाहीत . मात्र, मध्य रेल्वेच्या हार्बर आणि मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी रविवारी प्रवास करताना लोकल सेवांचे वेळापत्रक पाहून बाहेर पडावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -