घरमुंबईनायरमध्ये दातांवर होणार मायक्रोस्कोपीक उपचार

नायरमध्ये दातांवर होणार मायक्रोस्कोपीक उपचार

Subscribe

रुग्णांना उत्तम, सुलभ उपचार

दातांचे रुट कॅनॉल करताना किंवा अन्य उपचार करताना हिरड्यांमधील बारीक रक्तवाहिन्या साध्या डोळ्यांनी दिसत नसल्याने अनेकदा रुट कॅनॉल अयशस्वी ठरते. त्यामुळे दातामध्ये पू होऊन दात पुन्हा दुखू लागतो. दातांवरील उपचार अधिक सूक्ष्मपणे, सखोल व बारकाईने व्हावेत यासाठी नायर दंत कॉलेजमध्ये आता दातांवर मायक्रोस्कोपीक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक उत्तम व सुलभ उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

चॉकलेट, तंबाखू, गुटखा खाल्ल्याने दात खराब होणे, कीड लागणे असे प्रकार घडतात. दात खराब झाल्याने पू होऊन दात प्रचंड दुखु लागतात. अशावेळी हिरड्यांमधील पू,कीड साफ करण्यासाठी दातांचे रुट कॅनॉल करावे लागते. दातांवर उपचार करताना डॉक्टरांना साध्या डोळ्यांनी हिरड्यांमधील रक्तवाहिन्या दिसत नाहीत, तसेच दातांमध्ये अडकलेले पदार्थही दिसत नाहीत. उपचार पूर्ण झाल्यानंतरही रुट कॅनॉल अयशस्वी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रुग्णांना पुन्हा उपचारासाठी डॉक्टरकडे फेर्‍या माराव्या लागतात. रुग्णांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नायर दंतवैद्यकीय कॉलेजमध्ये मायक्रोस्कोपीक उपचार पद्धती सुरू केली आहे. मायक्रोस्कोपीक उपचारासाठी परदेशातून चार अद्ययावत मशीन मागवल्या आहेत. मायक्रोस्कोप मशीन फेब्रुवारीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. मायक्रोस्कोपच्या वापराबाबत डॉक्टरांना माहिती व्हावी यासाठी नुकतेच नायर दंतवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये दंतसुरक्षा विभागाचे विभागप्रमुख डॉ. कुलविंदर सिंग बांगा यांनी दोन दिवसांचे ‘मॅग्निफिकेशन इन एंडोडॉन्टिक्स’ वर्कशॉप घेतले. यामध्ये डॉ. अनुप भारद्वाज यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर व पोस्ट ग्रॅज्युएशन करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

जगभरात दातांवर मायक्रोस्कोपने उपचार होत असताना भारतामध्ये पारंपरिक पद्धतीनेच उपचार करण्यात येतात. मायक्रोस्कोप उपचारासाठी परदेशात 25 ते 50 लाख मोजून ‘मॅग्निफिकेशन इन एंडोडॉन्टिक्स’ याचे शिक्षण घ्यावे लागते, तसेच मायक्रोस्कोप महागडा असल्याने भारतात त्याचा वापर टाळतात. त्यामुळे डॉ. कुलविंदर सिंग बांगा यांनी परदेशात जाऊन ‘मॅग्निफिकेशन इन एंडोडॉन्टिक्स’चे शिक्षण घेतले. देशातील डॉक्टरांना मायक्रोस्कोपचा वापर करता यावा यासाठी ते मोफत वर्कशॉप घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत सहा वर्कशॉप घेतले असून, जवळपास 700 डॉक्टर व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

काय आहे फायदा
मायक्रोस्कोपमुळे दातांचे रुट कॅनॉल अधिक सखोल व बारकाईने करणे शक्य आहे. मायक्रोस्कोपमुळे खराब दातांची व्यवस्थित सफाई करण्याबरोबरच दातांमध्ये अडकलेले अन्नपदार्थही सहज काढणे शक्य होते. हिरड्यांमधील रक्तवाहिन्याही स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांना कोणतीही इजा न होता सहज व उत्तम उपचार करता येतात.

- Advertisement -

नायरमध्ये मायक्रोस्कोप मशीन आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा रुग्णांना होणार आहे. डॉक्टरांसाठी घेतलेल्या ‘मॅग्निफिकेशन इन एंडोडॉन्टिक्स’च्या मोफत वर्कशॉपचा लाभ 12 डॉक्टरांनी घेतला.
– डॉ. कुलविंदर सिंग बांगा, विभागप्रमुख, दंतसुरक्षा विभाग नायर दंतवैद्यकीय कॉलेज

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -