घरताज्या घडामोडीमनसे - भाजप एकत्रित येण्याच्या हालचाली

मनसे – भाजप एकत्रित येण्याच्या हालचाली

Subscribe

‘राजकारणात कधीच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो’ असे म्हटले जाते त्याचा प्रत्यय राज्यात पाहावयास मिळाला. त्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्यानंतर आता मनसे आणि भाजपही एकत्रित येऊ पाहत आहेत. केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला मतदान केल्याने त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दहा महिन्यांवर पालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप अशी नवी राजकीय मोट बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने शिवसेना आणि भाजपच्या संबधात दूरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप, मनसेला जवळ करू पाहत आहे. शुक्रवारच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजप आमने सामने आली असतानाच मनसेने थेट भाजपला मतदान केलं. त्यामुळे शिवसेनेचा पराभव होऊन भाजपचे विकास म्हात्रे विजयी झाले. यावेळी काँग्रेसच्या उमेदवारानेही भाजपला समर्थन दिलं त्यामुळे शिवसेनेला दुहेरी धक्का बसला आहे. केडीएमसीची कोणतीही निवडणूक असो मनसेने नेहमीच तटस्थतेची भूमिका घेतली आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मनसेने भाजपला मतदान केलं. त्यामुळे भविष्यात मनसे आणि शिवसेना एकत्रीत येऊ शकते ही नांदी असल्याचेही बोललं जात आहे.

- Advertisement -

अडीच वर्षांचा काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा अपवाद वगळता महापालिकेत १९९५ पासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. १९९५ साली केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता असतानाही, महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळच्या प्रचाराच्या वेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना पाणी पाजण्याची भाषा प्रचार सभेतून केली होती. त्यावेळी शिवसेनेने, भाजपला सत्तेपासून दूर ठेवत अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर सत्तेसाठी शिवसेना भाजप एकत्रित आली. मनसेची हवा होती त्यावेळी २०१० च्या निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीत ही संख्या ९ वर स्थिरावली. दोन अंकी संख्याही गाठणे मनसेला मुश्किल झाले होते. मात्र नऊ नगरसेवक असलेल्या भाजपची संख्या ४२ वर पोहोचली.

डोंबिवली पूर्वेतील मनसेचे प्रभाग भाजपने काबीज केले होते. केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा भाजपला खूप फायदा झाला. ऑक्टोबर २०२० ला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. राज्यात शिवसेना आणि भाजप युती तुटल्याने राजकीय गणित फिस्कटली आहेत. भाजप मित्रपक्ष म्हणून मनसेला जवळ करू पाहत आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत हे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे भविष्यात केडीएमसीत राजकीय घडामोडी होणार हेच दिसून येतय.

- Advertisement -

सध्याचे पक्षीय बलाबल (सदस्य संख्या १२२)

शिवसेना- ५२
भाजप- ४२
मनसे- ९
काँग्रेस- ४
राष्ट्रवादी- २
अपक्ष- ११
बसपा – १
एमआयएम- १

गेली २४ वर्षे कल्याण डोंबिवलीचा निर्णय ठाण्याहून घेतला जातो. ठाण्याहून बसून इथला विकास होणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही हा निर्णय घेतला आहे. मनसेने पक्ष बघून नाही तर विकासासाठी मतदान केलं आहे. भविष्यात भाजप, मनसे एकत्रीत येतील कि नाही, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. – प्रकाश भोईर विरोधी पक्षनेता केडीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -