घरमुंबईमुख्यमंत्र्यांना भावा-बहिणीच्या नात्याचा विसर पडला - शालिनी ठाकरे

मुख्यमंत्र्यांना भावा-बहिणीच्या नात्याचा विसर पडला – शालिनी ठाकरे

Subscribe

मुंबईतून गेल्या ५ वर्षांमध्ये २६ हजाराहून अधिक महिला बेपत्ता झाल्याच्या आकडेवारीवरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांना भावा-बहिणीच्या नात्याचा विसर पडला आहे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या टीकेला उत्तर देणाऱ्या भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता बाहेर बसलेल्या मनसेला देखील उत्तर द्यावं लागत आहे. मनसेने राज्यात बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येत वाढ झालेल्या आकडेवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. ‘मुख्यमंत्र्यांना भावा-बहिणीच्या नात्याचा विसर पडला आहे’, असा टोला मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यंत्र्यांना लगावला आहे. तसेच, ‘बेपत्ता मुली शोधण्यासाठी पावलं उचलली नाहीत, तर आगामी निवडणुकीत महिलाच मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’वरून बेपत्ता करतील’, अशी खरमरीत शब्दांत टीका देखील त्यांनी केली आहे.

५ हजाराहून अधिक अल्पवयीन मुली बेपत्ता

विधानसभेत काही आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने राज्यातल्या बेपत्ता महिलांची आकडेवारी सभागृहापुढे मांडली. यामध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये मुंबईतून तब्बल २६ हजार महिला व मुली बेपत्ता झाल्याचं समोर आलं. त्यातली ५ हजाराहून अधिक अल्पवयीन मुली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या २६ हजार महिलांपैकी २ हजार २६४ जणींचा शोध अद्याप पोलीस विभागाला लावता आलेला नाही, यावरून विरोधतांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच कोंडीत पकडलं. त्याचबरोबर आता मनसेकडून शालिनी ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

- Advertisement -

‘याहून शरमेची बाब कोणती?’

‘राज्यातल्या महिला मुख्यमंत्र्यांना आपला भाऊ मानतात. रक्षाबंधनाला त्यांना राखी बांधतात. मात्र, मुख्यमंत्र्यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे लवकरच या बेपत्ता महिलांच्या शोधासाठी विशेष कृती दल स्थापन केलं नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये या महिलाच मुख्यमंत्र्यांना वर्षावरून बेपत्ता करतील’, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या. तसेच, ‘इतक्या महिला बेपत्ता असून ५ वर्षांत त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही, याहून शरमेची बाब कोणती?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – ठाण्यात मनसेचा दखलपात्र मोर्चा

राज्यातल्या मानवी तस्करीचं काय?

दरम्यान, यावेळी शालिनी ठाकरेनी मानवी तस्करीचा देखील मुद्दा उपस्थित केला. मानवी तस्करीमध्ये मुंबईनंतर नागपूरचा क्रमांक लागतो, असं टेस्टा (ट्रान्सफॉर्मिंग एक्सप्लॉयटेशन अॅण्ड सेव्हिंग थ्रू असोसिएशन) या संस्थेनं दाखवून दिल्याचं देखील शालिनी ठाकरेंनी म्हटलं आहे. याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी महिला आयोगावर देखील टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -