घरमुंबईमहापौर निधीकडे खासदार, आमदार, नगरसेवकांची पाठ

महापौर निधीकडे खासदार, आमदार, नगरसेवकांची पाठ

Subscribe

लोकप्रतिनिधींचे १ महिन्याचे मानधन तर कामगारांचा १ दिवसाचा पगार महापौर निधीला

मुंबईतील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी महापौर निधीत वाढ करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीकडेच खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह मोठ्या औद्योगिक कंपन्यांसह समाजातील प्रतिष्ठितांनीही पाठ फिरवली. त्यामुळे महापौर निधीत वाढ करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून एक महिन्याचे मानधन, तर महापालिकेच्या कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार महापौर निधीत जमा करण्याचा निर्णय महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतला आहे. त्यामुळे यासर्वांना महापौर निधीला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापौर निधी समिती बैठक पार पडली. परंतु ३८४ सदस्यांपैकी केवळ दहा टक्केही सदस्य उपस्थित न राहिल्याने अखेर या बैठकीचे कामकाज गुंडाळण्यात आले. खजिनदाराची २ पदे आणि १६ सदस्यांची पदे भरण्यात आल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. खासदार, आमदार, तसेच महापालिकेचे सर्व नगरसेवक यांना एक महिन्याचे मानधन महापौर निधीला देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र सर्वांना पाठवण्यात येणार आहे. त्याबरोबरच महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी व अधिकारी यांचा एक दिवसाचा पगारही महापौर निधीला देण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. खाजगी कंपन्या, उद्योग धंदे, व्यावसायिक कंपन्या आदींनाही महापौर निधीला मदत करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महापौर निधीत २ कोटींची रक्कम

महापौर निधीमध्ये सध्या २ कोटी १ लाख रुपयांची रक्कम असून याचा व्याजाच्या रकमेतून कर्करोग, हृदयरोग, मुत्रपिंड रोपण तसेच डायलेसीस आदींच्या उपचारासाठी गरीब गरजू रुग्णांना ५ हजार रुपयांची मदत केली जाते. परंतु या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हृदयशस्त्रक्रिया, मुत्रपिंडरोपण, कर्करोग रुग्णांना १५ हजार रुपये तर डायलेसीसच्या उपचारासाठी १५ हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसारसुद्धा निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे अर्ज येणार्‍या रुग्णांना १५ ते २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

‘महापौर रजनी’चेही आयोजन

महापौर निधीत वाढ करण्यासाठी ‘महापौर रजनी’चे आयोजन करण्यात आले आहे. ”येत्या दिवाळीनंतर या कार्यक्रमाचे आयोजन करून यातून महापौर निधीची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे महापौर महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

सर्वांनी फिरवली पाठ

मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह प्राचार्य, संपादक आदींसह समाजातील एकूण ३८४ प्रतिष्ठितांना या महापौर निधी संबंधातील बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. परंतु एकमेव माजी नगरसेवक विलास चावरी यांच्यासह विद्यमान नगरसेवक दहा ते बारा नगरसेवक कुणीही हजर नव्हते. त्यामुळे अखेर गणसंख्येअभावी रिक्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करत निधीमध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवीन सदस्यांची निवड

मानद खजिनदार म्हणून विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर नगरसेवक मंगेश सातमकर, प्रिती पाटणकर, रामदास कांबळे, दिपमाला बढे, महादेव शिवगण यांच्यासह ओएनजीसी, एसीसी, एचपीसीएल, ए अँड टी, बीपीसीएल, रिलायन्स उद्योग समूह, टाटा उद्योग आदींच्या समुहातील मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांची नव्याने सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -