घरमुंबईआगरी, मराठा समाजासह नवी मुंबई पोलिसांना नाना पाटेकरची प्रतीक्षा

आगरी, मराठा समाजासह नवी मुंबई पोलिसांना नाना पाटेकरची प्रतीक्षा

Subscribe

शुटींग मध्ये व्यस्त असल्याने त्यांची वेळ नक्की नाही, तरी त्यांना गणपती नंतर शहरात येण्यास आम्ही आग्रही राहणार असल्याचे पोलीस परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे व आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले

नवी मुंबई : शहरातील अनेक समाजाच्या प्रतिनिधीना संबोधित करण्यासाठी अभिनेता नाना पाटेकर येणार असल्याची ग्वाही पोलिसांनी दिली असली तरी ते नक्की कधी येणार याची कोणतीही कल्पना नाही. ते त्यांच्या शुटींग मध्ये व्यस्त असल्याने त्यांची वेळ नक्की नाही, तरी त्यांना गणपती नंतर शहरात येण्यास आम्ही आग्रही राहणार असल्याचे पोलीस परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे व आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले.

दोन गटात झालेला वाद सणांच्या काळात पुन्हा उफाळू नये म्हणून परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी २७ ऑगस्ट रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी त्यांनी नवी मुंबईत सलोखा कायम राहावा म्हणून अभिनेते नाना पाटेकर येणार असल्याची माहिती या वेळी दिली होती. मात्र ते कधी येणार याची काही कल्पना दिली नव्हती. त्या नंतर अभिनेते नाना पाटेकर शहरात येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.नवी मुंबई शहरात मराठा आंदोलानंतर आगरी विरुद्ध मराठा असा तेढ निर्माण झाला होता. दंगलीत सुमारे ५८ पोलीस अधिकारी-कर्मचारी, १८ नागरिक गंभीर जखमी झाले. २०० पेक्षा अधिक वाहनांची मोडतोड झाली. राहुल तोडकर या तरुणाची हत्या झाली आणि त्या प्रकरणी चारजणांना अटक झाली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘शत्रुराष्ट्रे दंगलींचा गैरफायदा घेऊन हिंसाचार भडकवण्यासाठी समाजमाध्यमांचा गैरवापर करतात. लोकसंख्येच्या २ टक्के गुन्हेगार समाजात आहेत. ते अशा कृत्यांत ओढले जातात,’ हे सुधाकर पाठारे यांनी निदर्शनास आणले. पुण्यातील गुन्हेगारी जगतातील अनेक उदाहरणे त्यांनी दिली. गुन्हेगारीमुळे न्यायव्यवस्था, तुरुंग, पोलीस, वकील यांवर खर्चाचा बोजा पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी चर्चा केली असून ते नवी मुंबईत लवकरच मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. सध्या ते जोधपूर येथे चित्रीकरण करीत आहेत. लवकरच ते आपली वेळ कळवतील, असेही पाठारे यांनी सांगितले.

- Advertisement -

उपस्थित नेत्यांनाही त्यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले.त्यानंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी सतर्क राहत शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असता आंदोलनाचा कोणताही फटका नागरिकांना पडला नाही. नुकत्याच झालेल्या भारत बंद मध्येही आंदोलकांनी शांततेत आंदोलन केल्याने नवी मुंबईतील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते.

दोन समाजात झालेला वाद निवळला असला तरी समाजात जागृकता आणण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे.त्यासाठी आम्ही आजही प्रयत्नशील आहोत.नाना पाटेकर यांच्या आम्ही संपर्कात असून जसा त्यांना वेळ मिळेल तसा कार्यकम या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. सध्या गणेशोत्सवाची धूम असून त्यानंतर लवकरच त्यांना आमंत्रित करण्यात येईल.
-डॉ. सुधाकर पाठारे – परिमंडळ १, उपायुक्त

राज्यात झालेल्या विविध आंदोलनाचा फटका शहरातील नागरिकांना पडत असून त्यातून तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढत आहेत.त्यासाठी सर्व समाजाला एकत्र करून त्यांचे समाज प्रबोधन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलीस व आगरी कोळी युथ फाउंडेशनच्यावतीने अभिनेते नाना पाटेकर यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आखण्यात येणार आहे. गणपती नंतर लवकरच सदर उपक्रम राबवण्यात येईल.
-निलेश पाटील – अध्यक्ष – आगरी कोळी युथ फाउंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -