घरमुंबईगणेश विसर्जनात डीजेचा ‘आवाज’ बंद!

गणेश विसर्जनात डीजेचा ‘आवाज’ बंद!

Subscribe

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने डीजेवर बंदी आणण्याची भूमिका हायकोर्टात मांडली. त्यावर शिक्कामोर्तब करत हायकोर्टाने डीजेवरील बंदी कायम ठेवली. तसेच या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची संधी प्रोफेशन ऑडिओ अ‍ॅण्ड लाइटनिंग असोसिएशन (पाला) या संघटनेला दिली नाही.

मुंबई : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरील बंदी मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी कायम ठेवली. त्यामुळे यंदा गणेश विसर्जनावेळी डीजेचा ‘आवाज’ बंद होणार आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने डीजेवर बंदी आणण्याची भूमिका हायकोर्टात मांडली. त्यावर शिक्कामोर्तब करत हायकोर्टाने डीजेवरील बंदी कायम ठेवली. तसेच या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची संधी प्रोफेशन ऑडिओ अ‍ॅण्ड लाइटनिंग असोसिएशन (पाला) या संघटनेला दिली नाही. या प्रकरणाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दोन दिवस राखून ठेवला होता.

ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमावलीप्रमाणे वातावरणातील ध्वनी नियंत्रणात राहील इतपत आवाजाची निर्मिती करणार्‍या डीजे साउंड सिस्टीमचीही निर्मिती करता येते, हे पटवून देण्यात याचिकाकर्ते अपयशी ठरले. तर गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक ७५ टक्के प्रकरणे डीजे साउंड सिस्टीमची होती, तसेच डीजे साउंड सिस्टीम सुरू करताच त्याचा आवाज ५० ते ७५ डेसिबल मर्यादेबाहेर जाऊन जवळपास १०० डेसिबलपासून सुरू होतो, असे राज्य सरकारने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवर त्याच्या वापरास मनाई करण्याची राज्य सरकारची भूमिका आम्ही मान्य करतो, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती शंतनू केमकर व न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने डीजेवरील बंदी उठवण्यात नकार दिला.

- Advertisement -

सुनावणी चार आठवडे स्थगित

‘पाला’ संघटनेने गणेशोत्सवापुरता तातडीने अंतरिम दिलासा देण्याची विनंती या वेळी कोर्टाला केली. परंतु त्यालाही हायकोर्टाने नकारच दिला. या अंतरिम आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागता यावी याकरताही संघटनेने त्याला तात्पुरती स्थगिती देण्याचीही विनंती केली. त्यालाही राज्य सरकारने विरोध दर्शवल्याने खंडपीठाने ती विनंतीही फेटाळली. या याचिकेवरील अंतिम सुनावणी चार आठवडे स्थगित केली. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -