घरCORONA UPDATEमास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश...काहीच नाही; बेस्ट कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे!

मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश…काहीच नाही; बेस्ट कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे!

Subscribe

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तू आणि सेवांना वगळण्यात आलं आहे. मात्र, या सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याची अट त्यात ठेवण्यात आली होती. याच अत्यावश्यक सेवांचा भाग असलेल्या बेस्टच्या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांना सॅनिटायझर, हँडवॉश, मास्क पुरवण्यात यावेत असे निर्देश असतानाही कामगारांना ते मिळतच नसल्याची गंभीर बाब ‘आपलं महानगर’च्या समोर आली आहे.

हात धुवायला साबणाचं पाणी ‘उपलब्ध’!

लॉकडाऊनमध्ये देखील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची ने-आण करण्यासाठी बेस्टच्या मोजक्या बसेस चालवल्या जातात. त्यामुळे बेस्टचे चालक, वाहक आणि इतरही अनेक कर्मचारी रोज नवनव्या लोकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना सॅनिटायझर आणि मास्कचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा बेस्ट प्रशासनाकडून करण्यात येतो. पण प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळंच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर देण्यातच आलेले नाहीत. वर सॅनिटायझरच्या संपलेल्या बाटल्यांमध्ये साबणाचं पाणी ओतून हात धुण्यासाठी ‘उपलब्ध’ करून देण्यात आलंय. त्यांना साधे हँडवॉश देखील उपलब्ध नसून त्या जागेवर बिस्लेरीच्या बाटलीमध्ये साबणाचं पाणी टाकून दिल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कामगारांच्या हातावर सुरक्षेसाठी सॅनिटायझर किंवा हँड वॉशच्या ऐवजी थुकपट्टीच लावली जात असल्याचं चित्र आहे. या कामगारांना मास्क देखील दिले जात नसल्यामुळे बेस्टच्या कामगारांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

- Advertisement -

बसेसचे निर्जंतुकीकरण केव्हा होणार?

बेस्ट मरोळ डेपो आणि बोईसर डेपोमधून काही बस सेवा रुग्णांच्या वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही आगारांतून रुग्णालयापर्यंत रुग्णांची वाहतूक बेस्टच्या बसेस करत आहेत. त्यामुळे या बसेसचंदररोज निर्जंतुकीकरण होणं आवश्यक आहे. मात्र, बेस्ट प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

कामगारांना हॅन्ड ग्लोव्हज केव्हा मिळणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट डेपोमध्ये कामगारांसाठी जागेची व्यवस्था नाही. त्यामुळे बेस्ट कामगार कमी जागेत गर्दी करून बसत आहे. तसेच अनेक बस डेपोत बेस्टच्या चालक वाहकांकडे हॅन्ड ग्लोव्हज देखील नाहीत. वेळोवेळी यासबंधीत मागणी करून देखील बेस्ट प्रशासन गंभीर होत नाही, असा आरोप बेस्ट कामगार संघटनांकडून कऱण्यात आला आहे.

बेस्टच्या अनेक बस डेपोमध्ये सॅनिटायझर पुरवण्यात येत नाहीत. त्याऐवजी बाटलीत साबणाचे पाणी टाकून हात धुण्यासाठी दिले जात आहे. त्यामुळे असं करून या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जीवाशी बेस्ट प्रशासन खेळत आहे. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज दिले पाहिजेत. मात्र ते देखील दिले जात नाहीत. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आहे.

जगनारायण कहार, सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -