घरमुंबईरिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर हेलिकॉप्टरच्या घिरट्या! ७ जण उतरले!

रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर हेलिकॉप्टरच्या घिरट्या! ७ जण उतरले!

Subscribe

मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर गुरुवारी सकाळच्या सुमारास एका हेलिकॉप्टरमधून ७ काळे कपडे घातलेल्या व्यक्ती उतरल्या आणि सगळेच बुचकळ्यात पडले...

देशभरात २० राज्यांमध्ये मतदान सुरू आहे. त्यासोबतच राज्यातल्या देखील ७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान सुरू आहे. मात्र, असं असतानाच मुंबईतल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयात मात्र वेगळंच काहीतरी घडत होतं. मुख्यालयाच्या इमारतीच्या वर सकाळच्या सुमारास स्थानिकांना एक हेलिकॉप्टर बराच वेळ हवेत थांबल्याचं दिसलं. त्यातही या हेलिकॉप्टरमधून काळे कपडे घातलेली ७ माणसं उतरल्याचं स्थानिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीवर अशा प्रकारे हेलिकॉप्टरमधून माणसं उतरल्याचं स्थानिकांनी कधीही पाहिलं नसल्याचं एका प्रत्यक्षदर्शींनं सांगितलं.

- Advertisement -

कसा झाला व्हिडिओ व्हायरल?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये काही प्रमाणात भितीची भावना निर्माण झाली. कुणाला काही कळेना! एका स्थानिकाने या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ काढून ‘महानगर’कडे पाठवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काहीतरी संशयास्पद सुरू असल्याचा अंदाज आल्यामुळे महानगरच्या टीमने यासंदर्भात तपास करायला सुरूवात केली.

काय दिसलं बँकेच्या टेरेसवर?

हे हेलिकॉप्टर साधारणपणे २ मिनिटं रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर घिरट्या घालत होतं. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून काळे कपडे घातलेली सात माणसं दोरीच्या साहाय्याने खाली उतरली. बघ्यांना काहीच कळत नव्हतं. त्यामुळे व्हिडिओ काढून सगळा प्रकार कैद करण्याचा प्रयत्न सगळे करत होते. ही ७ माणसं उतरल्यानंतर हेलिकॉप्टर निघून गेलं. आणि हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.

- Advertisement -

एनएसजीचे कमांडो का उतरले रिझर्व्ह बँकेवर?

यासंदर्भात जेव्हा ‘महानगर’ टीमने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली, तेव्हा सगळा प्रकार समोर आला. त्या हेलिकॉप्टरमधून उतरणारे ७ जण दुसरे तिसरे कुणी नसून नॅशनल सेक्युरिटी गार्ड अर्थात एनएसजीचे कमांडो होते. पण हे कमांडो बँकेच्या टेरेसवर का उतरले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच होता. अधिक विचारणा केल्यानंतर एमआरए पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यावर खुलासा केला.

रिझर्व्ह बँकेच्या वर हेलिकॉप्टरमधून उतरणारे ते एनएसजीचे कमांडो होते. आज संध्याकाळी तिथे एनएसजीची मॉकड्रील होणार आहे. या मॉकड्रीलसाठीच हा सराव सुरू होता.

संजय कांबळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, एमआरए पोलीस स्टेशन

अखेर पोलिसांकडूनच यासंदर्भात खुलासा केल्यानंतर हा सगळा प्रकार ‘क्लिअर’ झाला आणि व्हायरल व्हिडिओमधल्या संशयास्पद हालचालीमागचं कारण स्पष्ट झालं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -