घरCORONA UPDATECoronavirus: मुंबईत कोरोना विरोधात लढणाऱ्या नर्सेसची सुरक्षा वाऱ्यावर; नर्सेस आंदोलन करणार?

Coronavirus: मुंबईत कोरोना विरोधात लढणाऱ्या नर्सेसची सुरक्षा वाऱ्यावर; नर्सेस आंदोलन करणार?

Subscribe

कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोदींनी आवाहन केल्यानंतर २२ मार्च रोजी सर्व देशात टाळी-थाळीनाद केला गेला. ५ एप्रिल रोजी दिवा, मेणबत्ती पेटवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आरोग्य सेवा देणाऱ्या देवदूतांना कौतुकाची गरज आहेच, मात्र यापेक्षा जास्त गरज आहे ती आरोग्य सेवा देण्यासाठी सुरक्षित साधनांची. जगभरात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी PPE किट वापरले जात आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या नर्सेसना पीपीई किट दिले जात नाही, तसेच त्यांच्या आरोग्याकडेही योग्य ते लक्ष दिले जात नाही, याविरोधात आता नर्सेस एकजूट झाल्या असून त्या आंदोलनाचा पावित्रा घेणार आहेत.

भारतात कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना ५० हून अधिक डॉक्टर, नर्सेसना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात आतापर्यंत १०० हून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टर, नर्सेस यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. या परिस्थितीत डॉक्टर-नर्सेसना सुरक्षित साधने आणि इतर सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयात नर्सेसची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप जन स्वास्थ अभियान या संघटनेने केला असून तसे पत्रच महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पाठविले आहे.

- Advertisement -

जन स्वास्थ अभियान ही महाराष्ट्रातील नर्सेस कर्मचाऱ्यांची संघटना आहे. ५ एप्रिल रोजी या संघटनेने आयुक्त परदेशी यांना पत्र पाठवून आपली व्यथा मांडली आहे. “कोरोनाविरोधात लढण्यासाठी नर्सेस कोणतीही नुकसान भरपाई न मागता काम करत आहेत. अनेक नर्सेस महिला या कुटुंबातील एकट्या कमविणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना पीपीआ किट प्राप्त करुन देणे, सुरक्षित प्रवासाची सुविधा, पोषक आहार, कामाच्या ठिकाणी योग्य ती काळजी आणि नर्सेसना काही झाले तर कुटुंबियांना आधार देण्याची हमी गरज आहे.”, अशा काही मागण्या नर्सेसनी केल्या आहेत.

वरिष्ठ डॉक्टरांवर केले गंभीर आरोप

रुग्णालयात ज्या वॉर्डमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत, तेथील नर्सेसचीही चाचणी केली जाते. जर चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांना लगेचच कामावर रुजू होण्यास सांगण्यात येत आहे. १४ दिवसांच्या क्वारंटाईन नियमाचे इथे उल्लंघन होत असल्याकडे नर्सेसनी या पत्राच्या माध्यमातून लक्ष वेधले. नर्सेस या रुग्णाच्या सतत संपर्कात येतात. मात्र तरिही त्यांना पीपीई किट न देता ते फक्त डॉक्टरांना देण्यात येत आहेत. तसेच इम्युनिटी वाढण्यासाठी शरिराला पुरेशा आरामाची गरज असते. मात्र नर्सेसच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांना वाढिव ड्युटी लावली जात असल्याचाही आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

 


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -