घरमुंबईOmicron variant : १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून जवळपास १ हजार प्रवासी मुंबईत...

Omicron variant : १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून जवळपास १ हजार प्रवासी मुंबईत दाखल; आदित्य ठाकरेंची माहिती

Subscribe

कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जगाची चिंता वाढवली आहे. अशात मुंबईतही दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जातोय. यात १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत जवळपास १ हजार प्रवासी दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या जगभरात वाढत्या संसर्गामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांसंदर्भात चर्चा झाली. तसेच मुंबईतील लसीकरण मोहिमेचा देखील आढावा घेण्यात आला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सर्व जगाला भेडसावणारा दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन हा व्हेरियंट जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरतोय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची चाचणी होणं किंवा त्या प्रवाशांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

- Advertisement -

कोरोना सेंटरची तयारी सुरु करण्याचे पर्यटन मंत्र्यांचे निर्देश 

यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांचा शोध सुरु आहे. यात १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून जवळपास १ हजार प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्वांना ट्रेस केले जातेय. गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या लोकांना संपर्क करुन विचारपूस केली जातेय. मुंबईतील पूर्वतयारीचा आढावा घेतला असून कोरोना सेंटरची तयारी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान मुंबईत १०२ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ७२ टक्के लोकांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. मात्र लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दोन डोसमधील अंतर कमी करणे गरजेचे असून तशी विनंती केंद्राकडे करणार असल्याचे” आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान ”जगभरातील दोन – तीन देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहेत. पर्यटनासाठी कोणाची अडवणूक केली जाणार नाही, मात्र प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. आपण शाळा सुरु करत आहोत. पण काळजी घेणे गरजेचे आहे” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -