घरमनोरंजनवन अँड ओन्ली प्रियदर्शन !

वन अँड ओन्ली प्रियदर्शन !

Subscribe



लाईट्स, साउंड, कॅमेरा, ऍक्शन… हे शब्द ऐकले की, साहजिकच एखाद्या मालिकेच्या किंवा चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आठवण होते. आपण जे एखाद्या चित्रपटाच्या पडद्यावर पाहत असतो ते दिग्दर्शकानं ती कलाकृती बनण्याआधीच स्वतःच्या अंतःचक्षूंनी पाहिलेलं असतं. म्हणूनच तर चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम समजलं जातं. दिग्दर्शक के. विश्वनाथ, के. राघवेंद्र राव, मणिरत्नम, प्रभू देवा, राम गोपाळ वर्मा, अटली हे असे काही दिग्दर्शक आहेत ज्यांनी दाक्षिणात्य भाषांसोबतच हिंदीमध्येही हिट सिनेमे दिले. यात मोलाची भर टाकणारं आणखी एक नाव आहे, ते म्हणजे लेखक, निर्माता, दिग्दर्शक प्रियदर्शन नायर

प्रियदर्शनना बनायचं तर होतं क्रिकेटर पण ते झाले फिल्ममेकर. प्रियदर्शन यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे ३० जानेवारी १९५७ मध्ये केरळच्या तिरुअनन्तपुरममध्ये झाला होता. वडील लायब्रेरियन असल्यामुळे बहुदा त्यांचाही कल पुस्तकांकडे होता. त्यामुळे वाचनासोबतच लिखाणाबद्दलही जिव्हाळा होता. एकीकडे फिलॉसॉफ़ीमध्ये मास्टर्स करत असतानाच प्रियदर्शननी ऑल इंडिया रेडिओसाठी लघुनाट्य, छोट्या छोट्या स्किट्स लिहायला सुरुवात केली होती. खरंतर लिखाणव्यतिरिक्त क्रिकेटही त्यांचं पॅशन होतं. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. एकदा क्रिकेट खेळत असतानाच त्यांच्या डाव्या डोळ्याला मार लागला आणि त्याची नजरच गमवावी लागली. असं म्हणतात की, या घटनेपश्चात त्यांच्या वडिलांनी रंगाच्या भरात प्रियदर्शनचं क्रिकेटचं साहित्यच जाळून टाकलं. पण यावरही प्रियदर्शन म्हणतात की , जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आज मी जर क्रिकेटर असतो तर सेवानिवृत्त झालो असतो. एखाद्या बँकेत वगैरे काम करत बसलो असतो. पण नियतीला मला एक फिल्ममेकर बनवायचं होतं. मात्र प्रियदर्शन यांचा क्रिकेटबद्दलचा लगाव आजही तेवढाच आहे. आजही ते चित्रपटाच्या शूटिंगला क्रिकेटचं साहित्य घेऊन जातात. शूटिंगमधून फुरसतीच्या वेळात युनिटसोबत क्रिकेट खेळतात.

प्रियदर्शनच्या वडिलांना वाटत होतं की, त्यांनी शिक्षक व्हावं. प्रियदर्शनचं शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांनी विचारलंही होतं की, आता पुढे काय करण्याचा इरादा आहे ?… तेव्हा प्रियदर्शननी चित्रपट दिग्दर्शक होण्याची इच्छा वडिलांना बोलून दाखवली होती. त्यावर त्यांनी प्रियदर्शनना प्रतिप्रश्न केला होता की, चित्रपट दिग्दर्शन हे पण काय करियर आहे का?… पण तरीही वडिलांच्या इच्छेविरुद्ध का होईना, प्रियदर्शनचा कल चित्रपटांकडे होता. त्यावेळचे मोहनलाल, सुरेश कुमार, सणाला कुमारसारखे आजचे साऊथ मधील दिग्गज कलाकार प्रियदर्शनचे मित्र होते. मोहनलालच्या मदतीनेच प्रियदर्शन यांना काही चित्रपटांसाठी असिस्टंट स्क्रीनप्ले रायटर म्हणून काम मिळालं. १९८४ मध्ये त्यांनी ‘कुच्चापुरु मुकुकीथी’ या मल्याळम चित्रपटाने दिग्दर्शनात पदार्पण केलं. विनोदी धाटणीचा हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनला होता, जो यशस्वी ठरला. यानंतर प्रियदर्शन यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कधीच पाठी वळून पाहिलं नाही. अनेक मल्याळम , तेलगू आणि तामिळ चित्रपटही यशस्वी करून दाखवले.

१९९२ च्या ‘मुस्कुराहट’ या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाने प्रियदर्शननी बॉलिवूडमध्ये खातं खोललं. हा चित्रपट जरी फ्लॉप ठरला तरी त्यानंतर गर्दीश, सात रंग के सपने , विरासत कभी ना कभी, डोली सजा के रखना हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. हे सर्व चित्रपट त्यांच्या सुपरहिट साऊथ चित्रपटांचेच रिमेक होते. ज्यात गर्दीश सुपरहिट ठरला. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक झालं. विशेष बाब म्हणजे १९९६ साली प्रदर्शित झालेला प्रियदर्शन यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘कालापानी’. हा चित्रपट त्यांच्या करियरला मोठी कलाटणी देणारा ठरला. रायटर टी. दामोदर लिखित भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर आधारित अश्या या चित्रपटाला इलाई राजांच सुरेल संगीत लाभलं होतं. मोहनलाल, तब्बू , प्रभू सोबतच यात अमरीश पुरींचीही मुख्य भूमिका होती. हा मूळ मल्याळम भाषेतला चित्रपट नंतर तामिळ तेलगू आणि हिंदीत डब करून एक साथ रिलीज करण्यात आला. सर्वात प्रथम प्रियदर्शनना या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले.

प्रियदर्शनचा हिंदीत सर्वात जास्त यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे, २००० साली प्रदर्शित झालेला ‘हेराफेरी’. यानंतर एका वेगळ्या पठडीचा कॉमेडी जॉनर साकारणारा दिग्दर्शक हि त्यांची ओळख बनून गेली. एका गंभीर गोष्टीच्या अवतीभवतीचा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे विनोद… प्रियदर्शनच्या बहुतेक चित्रपटांत जरी हेच पाहायला मिळत असलं तरी प्रेक्षक त्याची मजा लुटायचे. हंगामा, हलचल, भागमभाग, चुपके चुपके, ढोल, भूलभुलैय्या, गरम मसाला, मालामाल विकली, दे दना दन अशा प्रियदर्शन पॅटर्न विनोदी चित्रपटांची रांगच लागली. प्रियदर्शननी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसारख्या कलाकारांच्या ऍक्शन हिरो इमेजला छेद देत त्यांच्यासाठी विनोदी भूमिकांचे दरवाजे उघडून दिले. परेश रावल यांच्या खलनायकी इमेजला विनोदाचं असं वळण लागलं की, परेश रावलनी आजपर्यंत साकारलेला खलनायक विस्मृतीत गेला.

तब्बल नव्वदपेक्षा जास्त चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या प्रियदर्शनना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘काला पानी’ या चित्रपटासाठी त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २००७ साली तामिळ चित्रपट ‘कांचीवरम’साठीही एक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मध्यप्रदेशातील प्रतिष्ठित किशोर कुमार पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव दक्षिण भारतीय आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -