घरCORONA UPDATELockDown: ठाण्यात बांधकाम व्यवसायिकांचे एक हजार कोटीचे नुकसान

LockDown: ठाण्यात बांधकाम व्यवसायिकांचे एक हजार कोटीचे नुकसान

Subscribe

लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया सारख्या सणाच्या दिवशीही घरांची बुकिंग न झाल्याने बिल्डर लॉबीमध्ये नाराजी आहे.

आर्थिक मंदीत सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोनाच्या संकटामुळे जबर फटका सहन करावा लागणार आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत असणारे कामगार मजूर हे गावी परतल्याने आणि अनेकजण जाण्याच्या तयारीत असल्याने बिल्डर लॉबी टेन्शनमध्ये आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक कामे अर्धवट अवस्थेत खोळंबून राहिली आहेत. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया सारख्या सणाच्या दिवशीही घरांची बुकिंग न झाल्याने बिल्डर लॉबीमध्ये नाराजी आहे. ठाणे जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांचे सुमारे एक हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती एमसीएचआय या बिल्डर संघटनेचे पदाधिकारी रवी पाटील यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

ठाणे, कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात बांधकाम व्यवसाय चांगलाच तेजीत सुरू आहे. मेट्रो, रिंगरूट, आयटी पार्क असे अनेक प्रकल्प भविष्यात साकारले जाणार असल्याने बड्या बिल्डरांनी या परिसरात मोठया प्रमाणात इन्वेस्टमेंट केल्याने मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. मुंबई ठाण्यातील घरांचे भाव गगनाला भिडल्याने या परिसरात सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं ही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे  सर्वसामान्य नागरिकही कल्याण, डोंबिवली, बदलापूर, टिटवाळा या परिसराला प्राधान्य देत आहेत. ठाणे जिल्हयात एकूण एक ते दीड हजाराच्या आसपास बांधकाम प्रोजेक्ट सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये बांधकाम व्यवसाय पूर्णत: बंद पडला आहे. अनेक ठिकाणी कामेही अर्धवट अवस्थेत खोळंबून राहिली आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले बांधकाम मजूर, कामगारांसमोर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे अनेक मजूर हे गावी परतत आहेत.

- Advertisement -

नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले बिल्डर यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच आता कोरोनाचे संकट उभं राहिलं आहे. तसेच बिल्डरांकडून ग्राहकांना वेळेत घर बांधून देणेही बंधनकारक आहे. बांधकामे ठप्प असल्याने बिल्डरांना ग्राहकांची डेडलाईन पाळणे अशक्य होणार आहे. गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयाच मुहूर्त हा बिल्डर लॉबीसाठी खूपच महत्वाचा असतो. या दिवशी नवीन घर बुकिंग करण्याकडे अधिकाधिक ओढा असतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या दोन्ही मुहूर्तांना घरखरेदीची बुकिंगही होऊ शकलेली नाही. मुंबई ठाणे सारख्या महत्वाच्या शहरात रेड झोन असल्याने बांधकामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. अनेकांचे नोकरी व रोजगार धोक्यात आल्याने नवीन घरांची बुकिंगही थांबलेली आहे. लॉकडाऊननंतर बांधकाम व्यवसाय लगेच सुरळीत येईल याची खात्री नाही. अशा अनेक अडचणीत बांधकाम व्याावसायिक सापडला आहे. बिल्डरांनी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. अनेक प्रोजेक्ट अर्धवट अवस्थेत असल्याने त्यांचा संपूर्ण पैसा अडकून पडलेला आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लॅटवर डिस्काऊंट स्कीम राबवावी लागणार आहे.

रेरा, नोटबंदी आणि जीएसटी या कचाट्यातून  बिल्डर लॉबीे सावरत असतानाच आता कोरोनाच्या संकटामुळे मोठा फटका सहन करावा लागणार आहे. लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. घरांची विक्रीही थांबली आहे. बिल्डर लाॅबीचे साधारण एक हजार कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे. तसेच बांधकाम व्यवसायाशी संबधित व अवलंबून असणारे पावणे तीनशेच्या आसपास छोटे-मोठे व्यवसाय आहे. त्या व्यवसायांनाही फटका बसला आहे. साईटवर मटेरियल पडून आहे. तसेच जे कामगार आहेत त्यांच्या पालनपोषण आणि स्टाफचे वेतनही द्यावे लागत आहे. परप्रांतिक मजूर गावी गेले असले तरी सुध्दा राज्यातील कामगारांनी पुढं आलं पाहिजे त्यांना चांगली संधी आहे. बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी सरकारने काही सवलती द्यायला हवेत. त्यासाठी स्टॅम्प डयुटी एक टक्का करण्यात यावी, रेडी रेकनर दराची पडताळणी करावी, गृहकर्ज कमी करण्यात यावा त्यासाठी रिझर्व बँकेने स्पष्ट आदेश द्यावेत, अशी सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे
– रवी पाटील, पदाधिकारी, बिल्डर असोसिएशन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -