घरमुंबई'या' अटी पूर्ण केल्यानंतरच रिटा बनणार पुरुष

‘या’ अटी पूर्ण केल्यानंतरच रिटा बनणार पुरुष

Subscribe

रिटा आसाम सरकारच्या उर्जा विभागात कंत्राटी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे रिटाला शस्त्रक्रियेसाठी आसाम सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

बीडची महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिताची ललित झाल्यानंतर लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचं समोर आलं. पण, या लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेसाठी शासकीय कर्मचारी असू दे किंवा सामान्य व्यक्ती सर्वांनाच मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. ललितचं प्रकरणही काही वेगळं नाही. ललिताला आपण पुरुष आहोत हे कळल्यानंतर त्याने ललित होण्याच्या मार्गावरुन आपली वाट सुरु केली. त्यासाठी ललितने आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अनेक परवानग्या घेतल्यानंतर त्याच्यावर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया जवळपास एक ते दिड वर्षांची होती.

आसामच्या रिटाला पुरुष असल्याचं वाटत आहे

आसामच्या रिटाला आपण पुरुष असल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे, तिला लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून पुरुष बनायचं आहे. पण, त्यासाठी तिला आसामच्या सरकारची परवानगी लागणार आहे. तर, परवानगी मिळाल्यानंतरच रिटाच्या पुढील तपासण्या केल्या जातील, अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली आहे. रिटा देवी गेली ३७ वर्ष महिला म्हणून जगत आहेत. पण, ललिलतवर झालेल्या यशस्वी लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेनंतर तिने मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातून शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला. पण, तिला त्यासाठी अनेक परवानग्या घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

आसाम सरकारची परवानगी बंधनकारक

व्यक्तीच्या कामाच्या स्वरुपावरुन लिंगपरिवर्तनासाठी वेगवेगळ्या प्रकारची परवानगी घ्यावी लागते. रिटा आसाम सरकारच्या उर्जा विभागात कंत्राटी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे रिटाला शस्त्रक्रियेसाठी आसाम सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच रिटावर पुढील उपचार होणार आहेत.

ना हरकत प्रमाणत्राची गरज

जर व्यक्ती शासकीय कर्मचारी असेल तर कार्यरत असलेल्या विभागातून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवणं गरजेचं असतं.

- Advertisement -

नाव बदलून घेणे

लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी सर्व परवानगी प्राप्त झाल्या की तिला किंवा त्याला नाव बदलून घेणं गरजेचं असतं. जेणेकरुन कुटुंबियांतील सदस्य आणि समाज त्याच नावाने त्या व्यक्तीला ओळखू शकेल.

स्वतंत्र मानसोपचारतज्ज्ञांचं मत

लिंगपरिवर्तनासाठी तिला किंवा त्याला उपचारांसोबतच मानसोपचारतज्ज्ञांचं मत जाणून घेणं ही महत्त्वाचं असतं. ती व्यक्ती मानसिक आणि शारिरीकरित्या फिट आहे का? याची देखील चाचपणी केली जाते, त्यानंतरच शस्त्रक्रियेचे निर्णय घेतले जातात.

समाजानं स्वीकारणं महत्त्वाचं

जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक बदल जाणवत असतील आणि त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करुन घेतली तर समाज स्वीकारेल का ? या भावनेमुळे लोकं आयुष्यभर झुरत राहतात. पण, आता कुठेतरी हा विचार बदलला आहे. नातेवाईक आणि कुटुंबियांना समजावणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्यामुळे समाजाने स्वीकारणंही महत्त्वाचं असतं.

” लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी संयम आणि वेळ देण्याची गरज असते. रिटाला स्वत: ला पुरुष बनायचं आहे. त्यामुळे तिच्यावर संपूर्ण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आतापर्यंत फक्त तिची सोनोग्राफी करण्यात आलेली आहे. बाकी चाचण्या तिला परवानगी मिळाल्यानंतर केल्या जातील. शस्त्रक्रियेदरम्यान तिची छाती, गर्भाशय काढलं जाईलं. त्यानंतर त्या जागी पुरुषाचे भाग लावले जातील.” डॉ. रजत कपूर, प्लास्टिक सर्जन, सेंट जॉर्ज रुग्णालय

” रिटा आसामची असल्याकारणाने तिला लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी तिथल्या सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ती शुक्रवारी परत आसामला गेली आहे. ती ऑगस्टमध्ये पुन्हा दाखल होईल. परवानगीनंतरच तिच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया केली जाईल. ” डॉ.मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक , सेंट जॉर्ज रुग्णालय

लवकरच ओपीडी सुरू होणार

बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललित साळवे यांच्यावर लिंगपरिवर्तनाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांना लिंगपरिवर्तनासाठी आतापर्यंत ८ जणांनी संपर्क केला आहे. स्वत:हून कॉल करुन या आठही जणांनी लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी विचारणा केली आहे. त्यात बीडच्या एका लहान मुलाचा ही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी किंवा सल्ल्यासाठी ओपीडी म्हणजेच बाह्यरुग्ण विभाग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ओपीडीचं उद्घाटन केलं जाणार असल्याचं ओपीडीचे प्रमुख आणि प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, या ओपीडीसाठी बोर्डही बसवण्यात आला आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया किंवा सल्ल्यासाठी येणाऱ्या रुग्णांना ओपीडी नेमकी कुठे आहे याची माहिती मिळणं सोपं होईल, असं ही डॉ. रजत कपूर यांनी ‘माय महानगर’शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

OPD
ओपीडी
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -