घरमुंबईबहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत मुख्य लढत

बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत मुख्य लढत

Subscribe

रविंद्र माने
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने कितीही जोर लावला तरी मुख्य लढत बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत असल्याचे मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीने दिसून येत आहे.
या पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपाचे राजेंद्र गावित, काँग्रेसचे दामोदर शिंगडा, सीपीआयचे किरण गहला, मार्कीस्ट लेनीस्ट पार्टीचे शंकर बदादे आणि संदिप जाधव अपक्ष असे एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत.२००९ ला झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी १३ हजार मतांनी चिंतामण वनगा यांचा पराभव केला होता. तर २०१४ ला आलेल्या मोदी लाटेत वनगांनी जाधव यांचा २ लाख २५ हजार मतांनी दारुण पराभव केला होता. वनगा यांना ५ लाख ३२ हजार ९९६ मते मिळाली होती. तर जाधव यांना २ लाख ९३ हजार २०८ मते पडली होती.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र, मतांची ही आकडेवारी कमालीची बदलली. पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाला एकूण ५ लाख ३२ हजार मते मिळाली होती. या संघात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या मतदार संघात बहुजन विकास आघाडीचे तीन, भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आले आहेत. या सहा मतदार संघांपैकी बोईसर, वसई, नालासोपारा, विक्रमगड आणि पालघर अशा पाच ठिकाणी बहुजन विकास आघाडीने उमेदवार उभे केले होते.
त्यात आघाडीला ३ लाख ३० हजार २७३ मते मिळाली होती. शिवसेनेने चार ठिकाणी उमेदवार देवून १ लाख ९५ हजार ४८३ मते घेतली होती. चार ठिकाणी उमेदवार उभे करणाèया भाजपानेही त्यावेळी १ लाख ७४ हजार ३४७ मते मिळवली होती. राष्ट्रवादी चौथ्या आणि काँग्रेस पाचव्या स्थानी राहिली होती.तर वसईत जनआंदोलन समिती, शिवसेना, भाजपा,काँग्रेस, श्रमजीवी संघटना अशा सर्व पक्षांनी मतदान केलेल्या विवेक पंडीत यांना ६५ हजार ३९५ मते मिळाली होती. त्यावेळी मोदी लाटेचा प्रभाव असतानाही बहुजन विकास आघाडीने सहापैकी ३ जागा जिंकून आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले होते. पालघर लोकसभेतील ५० टक्के मतदार वसई तालुक्यात आहेत. त्यावर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. या तालुक्यातील ३ आमदार, महापालिकेतील ११५ पैकी १०९ नगरसेवक,जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींवरही आघाडीचेच वर्चस्व आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील बविआच्या लोकप्रतिनिधींचा लोकांशी दैनंदिन संपर्क असणे, जाहीर सभेऐवजी दारोदार जावून प्रचार करणे, आपल्या एकूण एक मतदारांकडून मतदान करवून घेणे, मुबलक पाणीपुरवठा, रस्ते, तलावांचे सुशोभीकरण, गटारे, कला-क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आघाडीने राबवले आहेत. कॉलेज प्रवेश, महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्रवासी यांच्या समस्या सोडवण्यास आघाडीने प्राधान्य दिले आहे. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार हितेंद्र ठाकुर यांच्यावर केलेल्या जहरी टिकेमुळे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेने जाहीर सभा आणि रॅलीवर भर दिला आहे. फक्त १२ दिवस प्रचाराला मिळालेले असताना सेनेने मतदारांपर्यंत पोहोचण्याऐवजी शक्तिप्रदर्शन करून नेत्यांचा रोड शो केला आहे. एकनाथ शिंदे, रविंद्र फाटक, आदित्य ठाकरे, दिपक केसरकर, आदेश बांदेकर, दिवाकर रावते, उद्धव ठाकरे अशा दिग्गज नेत्यांनी वसई तालुक्यात श्रीनिवास वनगा यांचा प्रचार केला आहे. आयात केलेल्या उमेदवारांमुळे शिवसैनिक निराश झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मुळ मतांमध्ये फरक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याहीपेक्षा बिकट अवस्था भाजपाची झाली आहे. दोन मुख्यमंत्री, सहा मंत्री, २५ आमदार आणि इतर दिग्गज नेते वसई-विरारमध्ये जाहीर प्रचार करीत आहेत. या दिग्गजांची उठबैस, पाहुणचार, त्यांच्या सभेची व्यवस्था, कार्यकर्त्यांची जमवाजमव,पैशाची जुळवाजुळव करताना स्थानिक पदाधिकारी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत त्यांना अजूनही थेट पोहोचता आलेले नाही. मंत्र्याची व्यवस्था करण्यात सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत कार्यकर्तेही जुंपले आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहीर सभेशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.उत्तर भारतीय आणि गुजराती मते हे भाजपाचे भांडवल आहे.
मात्र, सभेला जमलेल्या ५० टक्क्यांहून अधिक उत्तर भारतीय इथले मतदार नाहीत. तर नोटबंदी, वाढती महागाई, वाढते कर, बंद पडू लागलेले व्यवसाय यामुळे त्रस्त झालेला गुजराती व्यापारीही या निवडणुकीत भाजपाला सहाय्य करण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे राजेंद्र गावित तिसèया स्थानावर जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसची अवस्था नसल्यासारखीच आहे. ९ वेळा उमेदवारी मिळालेले दामु शिंगडा दहाव्यांदा रिंगणात आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हुसेन दलवाई, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश शिंगडांचा जमेल तसा प्रचार करीत आहेत. येथील काँग्रेसमध्ये असलेले अनेक गट हे त्यांचे मुळ दुखणे आहे. आमची कुणाशीच स्पर्धा नाही. आम्ही जिंकणारच असे वक्तव्य करून त्यांनी स्वतःचेच हसू करून घेतले आहे. वसई आणि विरार ही दोन्ही शहरे त्यांची प्रचारासाठी निवडली आहेत. सर्वात जास्त मतदार असलेल्या नालासोपारा मतदारसंघाचा मात्र त्यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यात असलेला दुरावा काँग्रेसची लंगडी बाजू आहे.
गावाला गेलेले मतदार ही मुख्य समस्या सर्व पक्षांना भेडसावत आहे. त्याचा फटका भाजप आणि शिवसेनेला पडणार आहे. उत्तर भारतीय आणि गुजराती बांधव दूरच्या गावाला गेल्यामुळे मतदानाला पोहोचण्याची त्यांची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे चाकरमान्यांवर प्रमुख भिस्त असलेल्या शिवसेनेचा मतदारही जूनच्या पहिल्या आठवड्यात परतण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनाही फटका पडणार आहे. गावी गेलेल्या मतदाराला मतदान करण्यासाठी कसे बोलवायचे आणि त्याची गावी परतण्याची कशी व्यवस्था करायची याचा फंडा अवगत असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र, फारसा फटका बसणार नाही. त्यामुळे मुख्य लढत आघाडी आणि शिवसेनेतच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -