घरमुंबईसुस्थितीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक?

सुस्थितीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक?

Subscribe

उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम वादात सापडले आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होऊनदेखील ते खड्डे बुजविण्यात ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, मुंबई महापालिकेकडून दुर्लक्ष केले जाते. पण उल्हासनगर महापालिकेने मात्र सुस्थितीतील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा घाट घातला आहे. उल्हासनगर मधील गोल मैदान परिसरात असलेल्या एका सुस्थितीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. या रस्त्यावर ४५ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. मनपाची आर्थिक स्थिती कमकुवत असताना अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी होत असल्याने पालिकेच्या या कारभारावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – राज ठाकरेंवर बोलण्याची अंजली दमानियांची लायकी नाही – रिटा गुप्ता

पेव्हर ब्लॉकचे काम बेकायदेशीर

उल्हासनगर – २ येथील गोल मैदान परिसरात नगरसेविका सरोजिनी टेकचंदानी यांच्या प्रभागातील हेमराज डेअरी रस्ता या सुस्थितीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. या रस्त्यावर ४५ लाखांचा निधी खर्च करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने देखील पेव्हर ब्लॉक बसविण्यास बंदी केली असताना या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शहरातील अनेक वादग्रस्त कंत्राटांची चौकशी सुरू केली आहे. तब्बल १६ कोटींची कामे थांबवण्यात आली आहेत. या कंत्राटांची बिले देखील रोखली आहेत. असे असतांना देखील रस्त्यावर बेकायदेशीर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत.

- Advertisement -

हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता. याबाबत मी सतत पाठपुरावा करून रस्त्याचे काम मंजूर करून घेतले आहे. या कामाबद्दल कोणाची तक्रार असेल तर मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हे काम का बंद केले नाही? आणि जर हे काम बंद केले गेले, तर मी न्यायालयात मनपा प्रशासनाविरुद्ध दाद मागणार.
सरोजिनी टेकचंदानी, स्थानिक नगरसेविका

हा रस्ता खराब अवस्थेत होता. तसेच हा रस्ता वर्दळीचा असून तेथे अनेक जलवाहिन्यादेखील आहेत. त्यामुळे तेथे खोदकाम करता येत नाही. म्हणून आम्ही पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
संदीप जाधव, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उल्हासनगर मनपा

पेव्हर ब्लॉकचे काम या रस्त्यावर होत असल्यास ते चुकीचे आहे. कामाची माहिती घेऊन मी लगेच हे काम बंद करण्याचे आदेश देणार आहे.
संतोष देहरकर, उपायुक्त उल्हासनगर मनपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -