घरमुंबईपेंच व्याघ्र प्रकल्प होणार अवनीच्या बछड्यांचे घर

पेंच व्याघ्र प्रकल्प होणार अवनीच्या बछड्यांचे घर

Subscribe

टी-1 म्हणजे अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांचे काय होणार याची चिंता सर्वांनाच पडली होती. मात्र अवनीच्या बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहीम वन विभागाने हाती घेतली आहे. येत्या काही दिवसांत या दोन्ही बछड्यांना ट्रँन्क्युलाईज करून सुरक्षितरित्या पकडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांना नागपूरजवळील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्येे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडताना तेथील वातावरण या बछड्यांसाठी कसे आहे याचा आधी अभ्यास करण्यात येईल. पुढच्या काही दिवसात बछड्यांना बेशुद्ध (ट्रॅन्क्युलाईज ) करून त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना पेंचमध्ये सोडण्यात येणार आहे. सध्या हे दोन्ही बछडे 11 ते 12 महिन्यांचे असून, त्यांच्यावर वनखात्याकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सुनील लिमये यांनी सांगितले.

- Advertisement -

वडिलांच्या सावलीत असलेल्या या दोन बछड्यांनी आता वडिलांकडून शिकारीचे प्रशिक्षण घेतले आहे. जंगलात सुरक्षित अंतरावर फिरून हे बछडे छोटी शिकारही करू लागले आहेत. सध्या वनविभागाचे पथक बोराटीच्या (अंशी) जंगलात डोळ्यात तेल घालून अवनीच्या बछड्यांवर लक्ष देत आहेत. तसेच त्यांच्या शिकारीसाठी वनविभागाने डुकरांची छोटी पिल्ले सोडली आहेत. आता तर बकरी, हरिण, तसेच इतर छोटे प्राणी बोराटीच्या जंगलात झाडाला बांधून हे बछडे त्यांची कशी शिकार करतात हे देखील पाहिले जात आहे. तसेच अजून काही दिवसांनी यापेक्षा मोठे जनावर बांधून त्याची शिकार हे बछडे करू शकतील का? याचे देखील निरीक्षण केले जाणार आहे.

काय आहे अवनी प्रकरण?
13 जणांचा बळी घेणार्‍या अवनी वाघिणीला 2 नोव्हेंबरला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. ही वाघीण दोन बछड्यांसह राळेगाव तालुक्यातील बोराटीच्या जंगलात वास्तव्याला होती. यादरम्यान नर वाघदेखील तिच्यासोबत होता. दोन वर्षांत १३ जणांवर हल्ले करून त्यांना ठार मारणार्‍या अवनीची पंचक्रोशीत दहशत पसरली होती. यामुळे ट्रॅन्क्युलाईज करून तिला पकडा अथवा वेळप्रसंगी ठार मारा, असे आदेशच न्यायालयाने दिले होते. मात्र वन्यजीवप्रेमींचा याला विरोध होता. वनविभागाचे २०० च्यावर अधिकारी व कर्मचारी बोराटीच्या जंगलात रात्रंदिवस अवनीचा शोध घेत होते. अखेर २ नोव्हेंबरच्या रात्री अवनी वनविभागाच्या पथकाच्या टप्प्यात आली आणि शार्पशूटर शहाफत अली खान याचा मुलगा अजगर अली याने अवनीला गोळ्या घातल्या. त्यानंतर सर्वच स्तरातून वनखाते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच वाघिणीच्या त्या दोन बछड्यांचे काय होणार, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींसह सर्वांनाच पडला होता.

- Advertisement -

वनविभाग या दोन्ही बछड्यांवर लक्ष ठेवून आहे. हे दोन्ही बछडे आता स्वतःहून शिकार करायला लागले आहेत. या बछड्यांची प्रगती लक्षात घेता त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल.
– सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

सध्या या बछड्यांसोबत त्यांचे वडील म्हणजे टी-२ हा वाघ राहत नाही. हे दोन्ही बछडे स्वतः शिकार करू लागले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही सध्या खाद्य पुरवतो. याआधी चिंता होती की त्यांचे काय होणार. पण आता ते स्वतः शिकार करू लागले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना नागपूरजवळील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार आहे.

– सुनील लिमये, अप्पर प्रधान, मुख्य वनसंरक्षक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -