घरमुंबईमहावितरणची ‘फोटो मीटर रिडिंग’ होणार बंद

महावितरणची ‘फोटो मीटर रिडिंग’ होणार बंद

Subscribe

महावितरणने १ फेब्रुवारी २०१९ पासून वीज बिलावरील मीटर रिडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज बिलाबाबतची तसेच इतर महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीज बिलावर मीटर रिडिंगचा फोटो छापण्याची पद्धत सुरू केली होती. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र, यात बिल तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रिडिंगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु, आता महावितरणकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच मीटर रिडिंग घेताच त्याची माहिती तत्काळ उपलब्ध करून दिली जाते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडिंग पडताळणीसाठी उपलब्ध होईल. तसेच, मीटर रिडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होईल.

- Advertisement -

फोटो मीटर रिडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात येईल. तसेच, मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणार्‍या जागेवर ग्राहकांना वीज बिलासंबंधी पुरक माहिती देण्यात येईल.

सुमारे दोन कोटी सात लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. उर्वरित वीज ग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -