घरमुंबईKDMC अभियंता हल्ला प्रकरण : सीसीटिव्हीच्या आधारे आरोपी अटकेत

KDMC अभियंता हल्ला प्रकरण : सीसीटिव्हीच्या आधारे आरोपी अटकेत

Subscribe

कल्याण - डोंबिवली महापालिकेतील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्या हल्लेखोरांना पकडण्यात रामनगर पोलिसांना यश आलं आहे.

कल्याण – डोंबिवली महापालिकेतील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्या हल्लेखोरांना पकडण्यात रामनगर पोलिसांना यश आलं आहे. परशुराम अनंदा वारकरी (वय ३४), सचिन रघुनाथ पाटील (वय ३०), उमेश पांडूरंग राऊत (वय ४१) आणि मयूर रमेश सुर्वे (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. शुक्रवारी त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सीसीटिव्हीच्या आधारेच पोलिसांनी चौघांना अटक केली असून हल्ल्याचे कारण अजूनही अस्पष्ट असून तपास सुरू आहे अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

चेहरे कॅमेऱ्यात कैद झाले

केडीएमसीचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर २२ मार्च रोजी डोंबिवली स्कायवॉकवर चौघांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. संध्याकाळी सहा वाजता कार्यालयातून घरी जात असतानाच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधल्याने त्यांचे चेहरा ओळखता येत नव्हते. पाटील यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे हल्लेखोर स्कायवॉकच्या जिन्याने पळून गेले होते. स्कायवॉकवर सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने आजूबाजूच्या दुकानाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी तपासले होते. त्यावेळी स्कायवॉकवरील जिन्यावरून पळाल्यानंतर काहींनी तोंडावरील मास्क काढले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे कॅमेऱ्यात कैद झाले होते. सीसीटिव्हीच्या आधारेच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या तपासासाठी पोलिसांनी चार पथक तयार केली होती. अखेर या चौघांना रायगड जिल्हयातील माणगाव येथून अटक केली. हे चौघेही डोंबिवलीत राहणारे असून माणगाव येथे जत्रेला पळून गेले होते. या चौघांवर अगोदरही गुन्हे दाखल आहेत. पाटील यांच्यावर त्यांनी हल्ला का केला, हल्ला करण्यासाठी कोणी सांगितले होते का, या सगळयाचा तपास सुरू असून त्यांच्याकडून लवकर ही माहिती उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -