घरमुंबईचोरट्यांना पकडण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची मोहीम

चोरट्यांना पकडण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची मोहीम

Subscribe

मुंबईतल्या रेल्वे स्थानकांत गेल्या काही दिवसांत चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रडारवरचे चोरटे वारंवार चोरीच्या गुन्ह्यांत पकडले जात असल्यामुळे अशा चोरट्यांना पकडून तुरुंगात घालवण्यासाठी आता पश्चिम रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी एक वेगळी मोहीम हाती घेतली आहे. चर्चगेटपासून अंधेरीपर्यंतच्या लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने एका पथकाची स्थापना करण्यात आली असून या पथकाच्या माध्यमातून वारंवार चोर्‍या करणार्‍या १६ अट्टल चोरट्यांची यादी बनवण्यात आली आहे. पोलिसांनी आठ दिवस ही कारवाई करत १६ पैकी ११ चोरट्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांवर पोलीस आता मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी लोहमार्ग पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या पथकाची स्थापना करण्यात आली आणि वर्षभर लोकलमध्ये झालेल्या चोर्‍यांमध्ये जास्त गुन्ह्यांत सहभागी असणार्‍या या १६ चोरट्यांची यादी बनवण्यात आली होती, त्यानुसार ११ जणांना अटक करण्यात आलेली आहे.

अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जास्तीत जास्त चोरट्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात ३१८ चोरट्यांना अटक करण्यात आली असून यामध्ये सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची संख्या ही ४४ इतकी आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात २२ चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असल्याची माहिती मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.

- Advertisement -

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खातिफ शेख,रफिक पटेल,शकिल खलिल अहमद शेख,देवा भालेराव,सिद्धेश कक्कड,इम्रान अली मेहमुद अली सय्यद,अब्दुल वाहिद मकबुल मन्सुरी,सुरेश साळवी,महावीर वर्मा,आसीफ झाकीर मुल्तानी,साहील अब्दुल कय्युम सय्यद यांचता समावेश असून उर्वरीत पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पश्चिम रेल्वे लाईनवरच्या सर्व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने ही मोहीम उघडण्यात आली असली तरी सर्व लोहमार्ग पोलीस ठाण्यातील मोजकेच अधिकारी तपासासाठी या पथकात आहेत त्यांच्याकडूनही कारवाई सुरु असल्याची माहिती या पथकातील एका अधिकार्‍याने दिली. उर्वरीत आरोेपींनासुद्धा लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -