घरमुंबई२६/११ च्या हल्ल्यावेळी पोलीसही घाबरलेले

२६/११ च्या हल्ल्यावेळी पोलीसही घाबरलेले

Subscribe

छायाचित्रकार सॅबेस्टियन डिसुझाचा धक्कादायक अनुभव

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी १0 वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्याने मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील नागरिकांच्या मनावर खोल जखम केली आहे. कसाब व त्याच्या साथीदारांनी केलेल्या या हल्ल्यामुळे मुंबई पोलिसांनी आपले अनेक चांगले शिलेदार गमावले. परंतु या हल्ल्यामुळे मुंबई पोलिसांची यंत्रणा दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी किती सक्षम आहे, हेही स्पष्ट झाले. पोलिसांनी जिवंत पकडलेला दहशतवादी कसाबच असल्याचे ज्यांच्या छायाचित्रामुळे स्पष्ट झाले व दहशवादाचा ‘चेहरा’ जगासमोर आणला, ते दैनिक ‘मुंबई मिरर’चे माजी फोटो एडीटर सॅबेस्टियन डिसुझा यांनी त्यावेळीचे धक्कादायक निरीक्षण मांडले. या हल्ल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे तैनात असलेले पोलीस हे मोहम्मद अजमल आमीर कसाब व त्याच्या साथीदाराच्या हल्ल्यावेळी घाबरून लपले होते, अशी माहिती ‘दैनिक आपलं महानगर’शी बोलताना दिली.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यात अटक केलेला एकमेव दहशतवादी महंमद अजमल आमीर कसाब व त्याच्या साथीदाराचा सामना करताना मुंबई पोलिसांचे धाडसी, शूर व महत्त्वाच्या शिलेदार शहीद झाले. या शिलेदारांमुळे मुंबई पोलिसांची कधीही न भरून काढता येणारी हानी झाली. तसेच अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याने मुंबईचेही मोठे नुकसान झाले. परंतु याला पोलिसांचा भ्याडपणाच जबाबदार असल्याचा आरोप सॅबेस्टिनने केला आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी सीएसएमटीच्या शेजारीच असलेल्या ‘मुंबई मिरर’च्या कार्यालयात रात्री १० च्या सुमारास मी काम करत होतो. त्यावेळी अचानक सीएसएमटी स्थानकात गोळीबार होत असल्याचा आवाज कानी पडला. त्यामुळे मी व माझे अन्य छायाचित्रकार सहकार्‍यांनी तातडीने सीएसएमटी स्थानकाकडे धाव घेतली. परंतु कसाब व त्याच्या साथीदारांकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे माझे काही सहकारी स्थानकाबाहेरच थांबले. परंतु मी आजवर अनेक दंगलीच्या वेळी छायाचित्र काढले असल्याने बिनधास्तपणे गोळीबार होत असल्याच्या दिशेने गेलो. त्यावेळी कसाब व त्याचा सहकारी सीएसएमटीच्या सात क्रमांकाच्या फलाटाच्या दिशेने बाहेर पडणार्‍या मार्गावरून गोळीबार करत आत येत होता. फलाट क्रमांक सातच्या समोर असलेल्या बुकस्टॉलच्या मागे मी व दोन पोलीस आम्ही लपून बसलो होतो. कसाब व त्याचा साथीदार हे अंदाधुंद गोळीबार न करता प्रत्येक व्यक्तीवर निशाणा साधूण गोळी झाडत होते. एक गोळी झाडल्यानंतर दुसरी गोळी झाडण्याच्या कालावधीत पोलिसांना बराचसा वेळ मिळत होता. परंतु सीएसएमटी स्थानकातील पोलीस घाबरून लपून बसले होते. माझ्यासोबत असलेल्या दोन पोलिसांकडे असलेल्या बंदुकांच्या आधारावर कसाबचा सामना करणे अशक्य होते. परंतु एका पोलिसाने पुढाकार घेत कसाबवर गोळी झाडली. परंतु ती गोळी नेमकी कोठे गेली हे आम्हाला कोणालाच कळले नाही. याचदरम्यान मला कसाबचे छायाचित्र काढण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढे जाणार्‍या कसाबचे आणखी छायाचित्र काढता यावे यासाठी मी फलाट क्रमांक सातवरून लोकल गाड्यांमधून व फलाटांवरून उड्या मारत फलाट क्रमांक तीनच्या दिशेने धावत गेलो. त्याचवेळी त्याच्या समोरून जीवाच्या आकांताने धावत जाणार्‍या जाणार्‍या एका महिलेवर व रेल्वेस्थानकात जमीनीवर झोपलेल्या व्यक्तींवरही त्याने गोळ्या झाडल्या नाहीत. हे पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला.

- Advertisement -

कसाबच्या मागोमाग फलाट क्रमांक तीनवर जात असताना सीएसएमटी स्थानकातून मुख्य कार्यालयाकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावर जवळपास १५ ते २० पोलीस लपून बसल्याची मी पाहिले. या पोलिसांकडे एके ४७ सारख्या अत्याधुनिक गन होत्या. त्याच्या साहाय्याने ते कसाबचा सहज सामना करू शकले असते. परंतु दहशतवादी हल्ल्यावेळी नेमके काय करायचे याचे प्रशिक्षणच पोलिसांना नसल्याने ते अत्याधुनिक बंदुकांसह त्या गल्लीमध्ये घाबरून लपून बसले. कसाब हा बिनधास्तपणे समोर येऊन एकेकांवर निशाणा साधून गोळ्या झाडत होता. घाबरून लपून बसलेल्या पोलिसांनी जर त्याला प्रत्युत्तर दिले असते तर कसाब व त्याच्या साथीदाराला सीएसएमटी स्थानकातच रोखणे शक्य झाले असते. सीएसएमटी स्थानकात कसाबने गोळीबार केल्यानंतर त्यांच्या बंदुकीमधील गोळ्या संपल्या होत्या. त्यावेळी तो गोळ्या भरण्यासाठी पुन्हा रेल्वेस्थानकाबाहेर आला व गोळ्या भरून पुन्हा तो आतमध्ये आला. यादरम्यान पोलिसांनी धाडस दाखवले असते तर कसाब व त्याच्या साथीदाराचा सीएसएमटी स्थानकात अंत करणे सहज शक्य झाले असते, अशी माहिती सॅबेस्टियन डिसुझा यांनी दिली.

आपल्या पोलिसांना फक्त उन्हात उभे राहण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, उरूस अशावेळी बंदोबस्तामध्ये जुनाट बंदुका व हातात दंडुके घेऊन उन्हात उभे राहण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. पोलिसांना हल्ल्याचा सामना करण्याचे प्रशिक्षण असते तर त्यांनी न घाबरता कसाबचा सामना केला असता व मोठी दुर्घटना टळली असती, असेही सॅबेस्टियनने सांगितले.

- Advertisement -

दंगलीमधील छायाचित्रांचा अनुभव कामी

१९९२  मधील मुंबईतील दंगल, गुजरात दंगल, घाटकोपरमधील रमाबाई नगरमध्ये झालेली दंगल, कामाठीपुरातील दंगल, जम्मू काश्मीरमधील दंगलींचे मी यापूर्वी छायाचित्रे काढली होती. दंगलीमध्ये छायाचित्र काढण्याच्या अनुभवामुळे अशा बिकट परिस्थितीमध्ये न घाबरता छायाचित्र काढण्याचे कसब माझ्याकडे होते. त्यामुळेच क्रुरकर्मा कसाब माझ्यासमोर मृत्यूचे तांडव घालत असतना माझी विवेकबुद्धी जागृत ठेवत अनुभवाच्या आधारे मी त्याचे छायाचित्र काढले. हे छायाचित्र काढताना त्याला कळणार नाही याचीही मी पूर्ण काळजी घेतली, असेही सॅबेस्टियन म्हणाले.

कसाबचा निशाणा अचूक होता

कसाब त्याच्या अत्याधुनिक गनमधून सहज समोरच्यावर निशाणा साधत होता. पण त्याचा निशाणा इतका अचूक होता की त्याच्या टप्प्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने गोळी घालून ठार केले. रेल्वेच्या उद्घोषणा केंद्रातील कर्मचारी उद्घोषणा करत असल्याचे पाहून कसाबने त्या दिशेनेही गोळी झाडली. त्यानंतर उद्घोषणा केंद्रातून होणारी उद्घोषणा बंद झाल्याचेही त्याने सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -