घरमुंबईपवईत ‘टीआयएसएस’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पवईत ‘टीआयएसएस’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Subscribe

‘टाटा सामाजिक विज्ञान’ (टीआयएसएस ) या संस्थेत शिकणार्‍या विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून पवई येथील राहत्या इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी पोलिसांनी संस्थेच्या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.संकेत तांबे (२४)असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पवईतील रामबाग येथे असणार्‍या कॉस्मोपोलिटीन सोसायटीतील पहिल्या मजल्यावर कुटुंबासह राहण्यास होता. संकेतची आई डॉक्टर असून वडील शासकीय अधिकारी आहेत. २०१५ मध्ये इंजिनीयरिंग पूर्ण केल्यानंतर संकेत याने २०१८ मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने ‘टाटा इन्सिट्युट ऑफ सोशल सायन्स’ मध्ये एम. बी.ए. साठी प्रवेश घेतला होता. या दरम्यान त्याला या संस्थेत असणारे प्राध्यापक विजय कुमार हे त्याला घालून पाडून बोलू होते. तसेच त्याचा अपमानास्पद वागणूक देत होते. त्यामुळे तो मानसिकदृष्टया खचला होता अशी माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.

सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संकेत राहत असलेल्या इमारतीवरून कोणीतरी पडल्याचा आवाज आल्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकांनी जाऊन बघितले असता संकेत हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत पडलेला दिसून आला.सुरक्षा रक्षकांनी इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना तसेच संकेतच्या आई वडिलांना कळवले. जखमी अवस्थेत असलेल्या संकेतला ताबडतोब उपचारासाठी जवळच्या हास्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

पवई पोलिसांना संकेतने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिट्टी मिळून आली आहे. त्यात त्याने प्राध्यापक विजयकुमार हे आपल्याला अपमानास्पद वागणूक देत असल्याचा उल्लेख केला असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. तसेच त्याच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेचे प्राध्यापक विजय कुमार यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोफळे यांनी सांगितले.या बाबत संकेतच्या कुटुंबियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -