घरताज्या घडामोडीपवई ते घाटकोपर भूमीगत जलबोगद्याचे काम १४७ कोटी खर्चूनही रखडले

पवई ते घाटकोपर भूमीगत जलबोगद्याचे काम १४७ कोटी खर्चूनही रखडले

Subscribe

मुंबई महापालिकेने अंधेरी, वांद्रे, घाटकोपर, कुर्ला आदी परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी २०१२ मध्ये हाती घेतलेले २६३ कोटी रुपये खर्चाचे पवई ते घाटकोपर भूमिगत जलबोगद्याचे काम २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र नियोजनाचा मोठा अभाव, काही तांत्रिक आणि यांत्रिक अडचणी उद्भवल्याने आज २०२२ साल उजाडले तरीही हे काम रखडले आहे. या कंत्राट कामात आजपर्यंत १४७ कोटींचा (कंत्राटदाराला देय ४२ कोटी रुपये अंतर्भूत) खर्च झालेला आहे. त्यामुळे या एकूण कंत्राटकामात पालिकेची मेहनत, वेळ, पैसे वाया गेलेच शिवाय कामही रखडले आहे.

कंत्राटदार सदर काम करण्यास असमर्थ ठरल्याने त्याच्याकडून कंत्राटकाम काढून घेण्याचा आणि नवीन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रकरण कोर्टात गेल्याने आणि त्यावर नंतर तडजोडीतून मार्ग निघाल्याने कंत्राटदाराला ४२ कोटींची रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता नवीन कंत्राटदार उपलब्ध झाल्यानंतरच सदर रखडलेले काम मार्गी लागणार आहे. म्हणून आता पुन्हा एकदा नवीन कंत्राटदार या कामासाठी येणार, तो यंत्रणा कामाला लावणार आहे. त्यानंतर पुन्हा कामाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. मात्र उर्वरित कामासाठी पुढे निश्चित आणखीन किती कालावधी लागेल, हे सांगणे कठीण आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

- Advertisement -

पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी २६३ कोटींचे काम

महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प खात्याने अंधेरी, वांद्रे, घाटकोपर, कुर्ला आदी परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी २२३ कोटी रुपये खर्चाचे पवई ते वेरावली आणि पवई ते घाटकोपर उच्चस्तर आणि पुढे घाटकोपर निम्नस्तर जलाशय दरम्यान भूमिगत जल बोगदा खोदण्याचे व बांधकाम करण्याचे काम २०१२ मध्ये हाती घेतले होते.

जलबोगद्यासंबंधित खालील कामे करण्याचे नियोजन

बोगदा खोदकाम यंत्राच्या साहाय्याने पवई ते वेरावली जलाशय या दरम्यान २.२० मी.व्यासाच्या आणि २.२० किमी लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम व नंतर बांधकाम करणे. तसेच, पवई ते घाटकोपर उच्चस्तर तसेच निम्नस्तर जलाशय दरम्यान २.२ व्यासाच्या व ४.३६६ किमी लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम व नंतर बांधकाम करणे. पवई, घाटकोपर उच्चस्तर जलाशय, घाटकोपर निम्नस्तर जलाशय आणि वेरावली जलाशय येथे ६० ते १०० मीटर खोल कुपकाचे बांधकाम करणे. तसेच, जल प्रवाह नियंत्रण झाडपांचा पुरवठा करून त्यांची उभारणी करणे आदि कामे करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

तांत्रिक, यांत्रिक व इतर अडथळे आल्याने काम रखडले

यापैकी कुपकाचे काम पूर्ण झाले आहे. बोगदा खोदकाम यंत्राच्या साहाय्याने पवई ते वेरावली जलाशय या दरम्यान २.२० मी.व्यासाच्या व २.२० किमी लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. मात्र कंत्राटकामात काही ठिकाणी झालेला नियोजनाचा मोठा अभाव, काही तांत्रिक व यांत्रिक अडचणी उद्भवल्या. पवई ते घाटकोपर उच्च स्तरीय जलाशय कामात पवईपासून १०० मी. अंतरावर जून २०१६ मध्ये भूस्तलाअंतर्गत प्रतिकूल परिस्थिती आढळून आली. तसेच, पवईपासून ११०८ ते १२०६ मी. अशा ९८.०० मी. लांबीच्या बोगद्याचे खोदकाम तुळयांच्या आधारे करताना तब्बल ३ वर्षांचा कालावधी लागला.

तसेच, ऑगस्ट २०१९ मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पवई यांच्या परिसरात जमीन खचून मोठा खड्डा निर्माण झाला. या खड्ड्याजवळ शिपिंग कॉर्पोरेशनची डाटा सेंटर इमारत असल्याने व पुढे काम चालू ठेवले असते, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी सदर काम ऑगस्ट २०१९ पासून बंद ठेवण्यात आले. तसेच, पवई ते घाटकोपर उच्चस्तर जलाशय बोगद्याच्या ठिकाणी बोगदा खोदाई यंत्र अडकले. त्या ठिकाणापासून पुढे आयआयटी पवई यांच्या सल्ल्याने सदर काम पुढे हाती घेतले. मात्र घाटकोपरच्या दिशेने १२० मीटर अंतरापर्यंत भुस्तरीय परिस्थिती खोदकाम करण्यासाठी अनुकूल नसल्याचे आढळून आले. आता यापुढील काम करण्यासाठी जुना कंत्राटदार मे. पटेल इंजिनिअरिंगला त्याचा खर्च आणि आतापर्यंत केलेल्या कामाचे शुल्क म्हणून ४३ कोटी रुपये देऊन नवीन कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. सल्लागार मे टाटा कन्सल्टिंग यांच्या सल्ल्याने पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.


हेही वाचा – Nirbhaya Squad: रोहित शेट्टीचा मुंबई पोलीसांच्या निर्भया स्क्वॉडसाठी स्पेशल व्हिडीओ, एकदा नक्की पाहा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -