घरमुंबईभाजलेल्या प्रिन्सच्या आई-वडिलांना भरपाई द्या; पालिकेकडे मदतीची मागणी

भाजलेल्या प्रिन्सच्या आई-वडिलांना भरपाई द्या; पालिकेकडे मदतीची मागणी

Subscribe

भाजलेल्या प्रिन्सच्या आई-वडिलांनी पालिकेकडे नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यातील बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या अडीच महिन्यांच्या प्रिन्सला आपला हात गमवावा लागला. भाजलेल्या हाताला संसर्ग झाल्याने, हाताचा रक्तपुरवठा बंद झाल्याने डॉक्टरांनी हा संसर्ग शरीरात पसरु नये, यासाठी हात कापण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, या बाळाला कायमचं अंपगत्व आलं आहे. बाळाच्या हृदयावर उपचार करण्यासाठी राजभर कुटुंब पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झालं होतं. पण, या बाळाला हृदयाच्या आजारावर उपचार करता-करता आता हातावर आणि भाजलेल्या चेहऱ्यावरही उपचार घ्यावे लागत आहेत. पण, अद्याप या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई झालेली नाही. उपकरण सदोष असूनही त्याची तपासणी न करता, त्याचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप केला जातो आहे.

केईएम हॉस्पिटलमधील या बाळाची आणि त्याच्या पालकांची मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी शुक्रवारी भेट घेतली. भेटीदरम्यान सर्व खर्च थांबवण्याच्या सूचना हॉस्पिटल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेमार्फत चौकशी समिती स्थापन करुन कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचं लेखी पत्र त्यांनी पालिकेला दिलं आहे.

- Advertisement -

नेमके काय झाले?

हृदयावर कमी खर्चात शस्त्रक्रिया होईल या आशेने उत्तरप्रदेशच्या महू जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर हे आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पण, गेल्या बुधवारी त्याला लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटर मशीनच्या वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यात हे बाळ भाजलं गेलं असून डावा हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे. पण, काहीही चूक नसताना त्यांच्या चिमुकल्या प्रिन्सला डावा हात गमवावा लागला. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर मोफत उपचार होतील. पण, त्यानंतर त्याच्या भविष्याचं काय? आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आता केली जात आहे. मुंबई पालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी प्रिन्सच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. पण, पालिकेनेदेखील या कुटुंबाला मदत करावी, अशा मागणीचं लेखी पत्र त्यांनी पालिकेला दिलं आहे.

‘पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये एका लहान बाळासोबत झालेला प्रकार खूपच वाईट आहे. या बाळाचे आई-वडील गरीब आहेत. हॉस्पिटलद्वारे या बाळाच्या उपचाराचा खर्च विनामूल्य होईल. पण, भविष्यात या बाळाच्या उपचारांसाठी पैसे लागतील. हे लक्षात घेऊन या कुटुंबाला मदत म्हणून मी २५ हजार रुपये दिले आहेत. पण, यावर भागणार नाही, त्यामुळे पालिकेनेदेखील पुढाकार घेऊन नुकसान भरपाई म्हणून या कुटुंबाला आर्थिक मदत द्यायला हवी. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल यांच्या नेतृत्वाखाली ही द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त झालेल्या अहवालानुसार यात कोणी दोषी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल’  – अमेल घोले; आरोग्य समिती अध्यक्ष

- Advertisement -

हेही वाचा – ११ दिव्यांगांना पेन्शनची रक्कम अदा, अटी शर्थीचे उल्लंघन?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -