घरमुंबईप्राध्यापकांचं कामबंद आंदोलन, मुंबईत शिक्षण नाही

प्राध्यापकांचं कामबंद आंदोलन, मुंबईत शिक्षण नाही

Subscribe

प्राध्यापकांनी पुकारलेल्या या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी होणार नसल्याचे काही संघटनांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठ आणि कॉलेजातील प्राध्यापकांच्या प्रंलबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडून आश्वासनाखेरीज काहीही मिळाले नाही. त्यामुळे प्राध्यापकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला असून मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या मागण्यासंदर्भात दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक आयोजित केली असली तरी एमफुक्टो संघटना कामबंदावर ठाम असल्याने, मंगळवारी मुंबईतील अनेक कॉलेजं बंद राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे संघटनांनी पुकारलेल्या या कामबंदात संघटनांमध्ये फूट पडल्यााचे दिसून आले आहे. इतर काही संघटनांनी या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदांची भरती, राज्यभरात नव्याने लागू झालेल्या विद्यापीठ कायद्यात समाविष्ट केल्या गेलेल्या विद्यापीठीय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या, तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या वेतन वृद्धी, महाविद्यालयांना आवश्यक असलेले वेतनेतर अनुदान आणि सोबतच ४ फेब्रुवारी ते १० मे २०१४ या कालावधीतील बहिष्कार आंदोलनाचे ७१ दिवसांचे रोखलेले वेतन यासंदर्भात एमफुक्टोने राज्य सरकारकडे दाद मागितली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्राध्यापक संघटनेने म्हणजे २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि राज्यभरातील प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासाठी उद्या मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यासाठी प्रमुख संघटनांना बोलाविण्यात आले असले तरी तोपर्यंत आपण संप सुरु करणार असल्यावर एमफुक्टो ठाम असल्याची माहिती मधू परांजपे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

- Advertisement -

दरम्यान सामूहिक रजा, बेमुदत आंदोलन, परीक्षा बहिष्कार असा आत्मघातकी प्रकारांना शिक्षकांनी बळी पडून आपलेच नुकसान करू नये, विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये तसंच बेमुदत आंदोलन हा शेवटचा पर्याय असतो त्यामुळे शिक्षकांनी कोणत्याही प्रकाराला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन मुक्ता संघटनेने सर्व शिक्षकांना केले आहे. त्यामुळे हे आंदोलन कितपत यशस्वी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीसाठी सर्व संबंधित सरकारी अधिकार्‍यांनासुद्धा पाचारण करण्यात आले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उच्च शिक्षण क्षेत्रातील तसेच प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून प्रशस्त मार्ग निर्मिती व समस्या समाधानाच्या अभियानाला यश प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, अशी शक्यता ‘मुक्ता’ (मुंबई युनिव्हर्सिटी अँन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन ) संघटनेने यानिमित्ताने व्यक्त केली.

हा तर दिखावा

‘दरम्यान १० मागण्या या केवळ शिक्षकांना संपात सहभागी करून घेण्यासाठीचा दिखावा आहे’, असा आरोप नॅशनल फोरम फॉर क्वॉलेटी एज्युकेशन या संस्थेने केला आहे. ‘केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निकषात न बसणार्‍या बिगर नेट सेट नियुक्त्यांना संपाच्या माध्यमातून, शासनातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांची दिशाभुल करणे व विद्यार्थ्यांना वेठीस धरून अशा बेकायदेशीर नियुक्त्याना वेतन आयोगाचे लाभ देणे’, यासाठी हा सगळा खटाटोप सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘मफुक्टोची भूमिका ही नेट सेटच्या विरोधातील असून  ती राष्ट्रीय शैक्षणिक धरणाचे उल्लंघन करणारी आहे’, असा आरोप नॅशनल फोरम फॉर क्वॉलेटी एज्युकेशन या संस्थेतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्राध्यापक संघटनांमधीलच वाद चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -